एका जागेवर उभ्या बस गाड्या भंगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:02 AM2021-06-02T04:02:01+5:302021-06-02T04:02:01+5:30
जाण्यापासून रोखण्याची रोज कसरत निर्बंधांचा परिणाम : कचरा अन् धुळीने भरल्या एसटी बस, चालू करून ठेवण्याची वेळ संतोष हिरेमठ ...
जाण्यापासून रोखण्याची रोज कसरत
निर्बंधांचा परिणाम : कचरा अन् धुळीने भरल्या एसटी बस, चालू करून ठेवण्याची वेळ
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावामुळे एसटी बस गाड्यांचा चक्का जाम आहे. एसटी महामंडळाच्या आगारांत बस अनेक दिवसांपासून जागेवर रांगेत उभ्या आहेत. त्यामुळे उभ्या बस भंगारात जाण्यापासून रोखण्याची कसरत एसटी कर्मचारी आणि कारागिरांना करावी लागत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या बसगाड्यांची पाहणी करण्यात आली. तेव्हा काही बसमध्ये अस्वच्छता, धुळीचे साचलेली पुटे मिळाली, तर काही कर्मचारी बसची स्वच्छता करण्याच्या कामात गुंतले होते. उभ्या बस काही वेळेसाठी चालू करून ठेवण्याची जबाबदारीही कर्मचाऱ्यांना पार पाडावी लागते. असे केले नाही तर ऐन प्रवासाच्या वेळी बस ‘हात’ देण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण उभ्या बसवर नेमका काय परिणाम झाला, हे जेव्हा बस धावेल, तेव्हाच लक्षात येईल, असेही सांगण्यात आले.
जिल्ह्यातील आगार-८
एकूण बस संख्या-५५०
------
फाटलेले सीट
मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या एका बसमध्ये काही सिटांचे कव्हर फाटलेले दिसले. या बसमध्ये सिटाखालील प्लास्टिमुळे मोठ्या प्रमाणात धूळ जमा झाली होती. त्यामुळे कारागिरांकडून प्रत्येक सीटमधील प्लास्टिक काढण्याचे काम करण्यात येत होते.
तुटलेले आरसे
आगारात उभ्या शिवनेरी बसचे दोन्ही आरसे तुटले होते. चिकट टेपने आरशाला आधार दिला होता. या आरशांतून चालकाला पाठीमागील भाग पाहण्यासाठी कसरत करावी लागत असणार. बसचा दरवाजाही अर्धवट अवस्थेत बंद होता.
ऑइल गळती
आगारात उभ्या एका साध्या बसच्या (लाल बस) डाव्या बाजूकडील दोन्ही चाकांतून ऑइल गळत होते. बसच्या समोरील जाळीला दोरी बांधण्यात आली होती. इंडिकेटरला लोखंडी पट्टीचा आधार दिला होता. आतमध्ये प्रथमोपचार पेटी उघड्या अवस्थेत पडून होती.
-----
१४ महिन्यांत फक्त ५ महिने रस्त्यावर
- एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील एसटी कोरोनात गेल्या १४ महिन्यांत केवळ ५ महिने पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आहे. गतवर्षी लाॅकडाऊन लागले आणि बस आगारातच उभ्या राहिल्या. त्यानंतर ऑक्टोबर ते मार्चपर्यंत सेवा सुरळीत सुरू होती.
-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर सुरू केल्यानंतर एप्रिलपासून पुन्हा एसटीचा चक्का पुन्हा जाम झाला. गेल्या दीड महिन्यापासून अत्यावश्यक सेवेसाठी, मालवाहतुकीसाठी एसटी, एसटी मालट्रक धावत आहे.
-----
उभ्या बसवर खर्चाची वेळ
-आगारात बस उभ्या राहिल्याने अनेक बसची अवस्था वाईट होत आहे. त्यामुळे बसची नियमित तपासणी, स्वच्छता केली जात आहे. यातून देखभाल-दुरुस्तीपोटी उभ्या बसवरही खर्च होत आहे.
- अनेक दिवस बस उभ्या राहिल्या तर बॅटरी उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे बस दोन ते तीन दिवसाला चालू केल्या जातात. जागेवर उभ्या राहिल्याने धुळीने भरून जातात. त्यामुळे स्वच्छतेचे कामही करावे लागत आहे.
-------
आधीच दुष्काळ....
बससेवा ठप्प राहिल्याने एसटीच्या औरंगाबाद विभागाला दिवसाला जवळपास ५० लाख रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत बस जागेवरच उभ्या राहून खराब झाल्या तर दुष्काळात तेरावा महिना, अशी स्थिती होईल. त्यामुळे जागेवर उभ्या बसकडेही अधिक लक्ष दिले जात आहे.
-----
बसचे नुकसान नाही
बस जागेवरच उभ्या राहिल्याने काही नुकसान होत नाही. लोखंडी बाॅडी असेल तर गंजते; पण एसटी बसची बाॅडी ही लोखंडी नसते. त्यामुळे तोही प्रश्न नाही. बसगाड्यांची नियमित देखभाल दुरुस्ती केली जाते. स्वच्छता केली जाते. बस सुरू केल्या जातात. त्यामुळे काही अडचण नाही.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ
---------
फोटो ओळ
१)मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या बस.
२)फाटलेले सीट
३)तुटलेले आरसे
४)चाकातून ऑइल गळती