वृद्ध, लहान मुले रस्त्यावर ताटकळले तरीही बस थांबेना, शेवटी 'तो' बससमोरच उभा राहीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 05:51 PM2024-09-16T17:51:12+5:302024-09-16T17:54:22+5:30

प्रवाशांसाठी समोर उभे राहून अडवली बस; वाळूजमध्ये बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल

Bus stopped by standing in front for passengers; Plight of passengers as bus does not stop in Waluj | वृद्ध, लहान मुले रस्त्यावर ताटकळले तरीही बस थांबेना, शेवटी 'तो' बससमोरच उभा राहीला

वृद्ध, लहान मुले रस्त्यावर ताटकळले तरीही बस थांबेना, शेवटी 'तो' बससमोरच उभा राहीला

वाळूज महानगर : एसटी महामंडळाच्या बस वाळूजमध्ये न थांबता निघून जात असल्याने प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. अनेकदा लेखी, तोंडी मागणी करूनही ‘बस थांबा’ दिला जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते रतन अंबिलवादे यांनी शनिवारी दुपारी पुण्याला जाणारी बस अडवून समोरील बाजूने वर चढत प्रवाशांना आत बसवून दिले. यामुळे काही काळ नगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

मागील तीन दशकांपासून वाळूज येथील नागरिक स्वतंत्र बसस्थानकाची मागणी करत असूनही एसटी महामंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे. याप्रकरणी आगारप्रमुखांशी संपर्क साधला असता, या प्रकरणाची अधिक माहिती घेत असल्याचे सांगितले.

काय घडले शनिवारी?
वाळूज येथील पोलिस ठाण्यासमोर १० ते १२ प्रवासी सुमारे अडीच ते तीन तासांपासून अहमदनगर आणि पुणे येथे जाण्याकरिता बसची वाट पाहत होते. दरम्यान अनेक बस आल्या आणि न थांबता निघून गेल्या. ही माहिती वाळूज येथील सामाजिक कार्यकर्ते रतन अंबिलवादे यांना मिळताच त्यांनी जळगाव ते पुणे बस (क्र. एमएच २० जीएस ३६२६) समोर आडवे येत ती थांबवली. चालक आणि वाहकांनी खाली उतरून अंबिलवादे यांना जाब विचारत अंबिलवादे यांचा बसवर चढलेला फोटाे काढून घेतला. वाहतूक कोंडी होत असल्याने वाळूज पोलिसांनी धाव घेतली. अंबिलवादे व वाहकाची समजूत घालून वाहतूक सुरळीत केली.

शासनाच्या योजनांचा काय उपयोग?
एकीकडे राज्य शासन महिला, वृद्धांना बस प्रवासामध्ये सवलत देत आहे. दुसरीकडे मात्र, थांबा न दिल्याने बस थांबत नसतील तर प्रवाशांना या योजनांचा काय उपयोग, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.

Web Title: Bus stopped by standing in front for passengers; Plight of passengers as bus does not stop in Waluj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.