बसचे आता ‘राउंड फिगर’मध्ये तिकीट; फायदा एसटीचा की प्रवाशांचा?

By संतोष हिरेमठ | Published: November 29, 2023 01:08 PM2023-11-29T13:08:42+5:302023-11-29T13:10:58+5:30

बस प्रवासात सुट्या पैशांची कटकट नाही; आता एक, दोन रुपयांचा हिशोब हद्दपार

Bus ticket now in 'round figure'; Benefit of ST or passengers? | बसचे आता ‘राउंड फिगर’मध्ये तिकीट; फायदा एसटीचा की प्रवाशांचा?

बसचे आता ‘राउंड फिगर’मध्ये तिकीट; फायदा एसटीचा की प्रवाशांचा?

छत्रपती संभाजीनगर : ‘लालपरी’ म्हणजे एसटीतून प्रवास करताना एक, दोन रुपयांच्या सुट्या पैशांवरून प्रवाशांसोबत होणाऱ्या वादावर कायमचा पडदा टाकण्यात आला आहे. कारण, एसटीत पाच रुपयांच्या पटीत म्हणजे ‘राउंड फिगर’मध्येच तिकीट आकारणी केली जात आहे. एक, दोन रुपयांचा हिशोब हद्दपार झाला आहे. यात फायदा एसटीचा की प्रवाशांचा, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

एसटी बसमधून प्रवास करताना पूर्वी तिकिटासाठी सुटे एक, दोन रुपये, तीन रुपये द्यावे लागत असत. सुटे पैसे नसल्यास वाहक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक खटकेही उडत. या सगळ्यावर पर्याय म्हणून थेट पाच रुपयांच्या पटीतच तिकीट दिले जात आहे. त्यामुळे प्रवासात सुट्या पैशांचा प्रश्नच संपला आहे. तिकिटासाठी पाच, दहा रुपये सहजपणे उपलब्ध होतात.

अशी होते आकारणी
एखाद्या प्रवासाचे तिकीट ७ रुपये असेल तर त्याऐवजी ५ रुपये आकारले जातात. तसेच ८ रुपये तिकीट असल्यास १० रुपये तिकीटदर आकारला जातो, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरहून काही शहरांचे भाडे
शहर - लाल बस - हिरकणी बस

पुणे - ३४० रु. - ४६५ रु.
अहमदनगर - १६५ रु. - २२५ रु.
धुळे - २२५ रु. - ३१० रु.
मुंबई - ५६० रु. - ७६० रु.
नाशिक - २९५ रु. - ४०५ रु.
बोरीवली - ५६० रु. - ७६० रु.

एसटी महामंडळाचे अधिकारी म्हणाले,
एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरचे विभागीय वाहतूक अधिकारी पंडित चव्हाण म्हणाले, पाच रुपयांच्या पटीत तिकीट आकारणीचा निर्णय हा जुनाच आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयानुसारच तिकिटाची आकारणी होते.

प्रवाशांचा फायदाच
पाच रुपयांच्या पटीत तिकिटाची आकारणी, हा एक चांगला निर्णय आहे. त्यात प्रवाशांचा फायदा आहे. प्रवासातील सुट्या पैशांचा प्रश्न सुटला आहे. इतर ठिकाणीही एक, दोन, तीन रुपयांचे व्यवहार सहसा दिसत नाहीत.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस

Web Title: Bus ticket now in 'round figure'; Benefit of ST or passengers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.