बसला वेग येणार ! एसटी महामंडळ घेणार सेवानिवृत्त चालक, जाहिरात प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 03:26 PM2022-01-06T15:26:25+5:302022-01-06T15:28:02+5:30
एसटी महामंडळातर्फे बुधवारी १२२ बसच्या माध्यमातून तब्बल ३२६ फेऱ्या करण्यात आल्या असून, ३ हजार ७९३ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली.
औरंगाबाद : एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूक देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी बुधवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. याविषयी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
एसटी महामंडळातर्फे बुधवारी १२२ बसच्या माध्यमातून तब्बल ३२६ फेऱ्या करण्यात आल्या असून, ३ हजार ७९३ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. तर आणखी दोन कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याने एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ३५ झाली आहे. एसटीचे प्रशासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी आंदोलन अजूनही सुरूच असल्याने प्रवासी सेवेवर मोठा परिणाम झालेला आहे. तरीही काही प्रमाणात सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे एसटी धावत आहे. बुधवारी सिडको बसस्थानकामधून २८ लाल परी, दोन हिरकणी अशा ३० बसच्या ७४ फेऱ्या करण्यात आल्या. मध्यवर्ती बसस्थानकातून २० शिवशाही बसच्या नाशिक व पुणे मार्गावर २७ फेऱ्या झाल्या. दिवसभरात एकूण ३५ बसच्या पुणे, नाशिक, कन्नड, सिल्लोड, बुलडाणा, नगर मार्गावर ६० फेऱ्या करण्यात आल्या.
माजी चालकांच्या भरतीवर प्रश्न
सेवानिवृत्त इच्छुक चालक करार पद्धतीवर नेमणूक होण्यासाठी अर्ज करू शकतील. परंतु या भरतीवरच आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सेवानिवृत्त झालेल्यांना कसे घेता येईल, त्यांच्या प्रशिक्षणाचे काय, असा सवाल उपस्थित केला आहे.