'बस आगारांमध्येच'; कोरोना संकटाने १३३ कोटींनी ‘एसटी’ खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 07:52 PM2021-06-04T19:52:24+5:302021-06-04T19:52:39+5:30
तब्बल १५१ दिवस ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली; परंतु ऑक्टोबरपर्यंतही एसटीची सेवा पूर्वपदावर आली नव्हती.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या लाटेपाठाेपाठ दुसऱ्या लाटेतही ‘एसटी’च्या वाहतुकीवर निर्बंध लागले. परिणामी, जिल्ह्यात महामंडळाची बस ठप्प झाली. कोरोनाच्या गेल्या १४ महिन्यांत एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला २६८ दिवस रोज ५० लाखांच्या नुकसानीला ताेंड द्यावे लागले. यातून तब्बल १३३ कोटींनी औरंगाबादची ‘एसटी’ खड्ड्यात गेली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवासी वाहतुकीवर निर्बंध गरजेचे आहेत; पण त्यासाठी ‘एसटी’ला कोट्यवधींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शासनाने २३ मार्चपासून लाॅकडाऊन जारी केले हाेते. परिणामी, एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. तब्बल १५१ दिवस ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली; परंतु ऑक्टोबरपर्यंतही एसटीची सेवा पूर्वपदावर आली नव्हती. त्यानंतर पुढील ५ महिने एसटीची सेवा रुळावर येत नाही तोच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. त्यामुळे ‘एसटी’च्या वाहतुकीवर पुन्हा निर्बंध आले. अत्यावश्यक सेवेसाठीच ‘एसटी’ला मुभा देण्यात आली. ‘एसटी’ने मालवाहतूकही सुरू केली; परंतु त्यातून ‘एसटी’चे कोट्यवधी रुपयांचे नुकसान भरून निघेल, अशी स्थिती नाही.
वैयक्तिक वाहनांनी प्रवासावर भर
गतवर्षी ऑक्टोबरपासून एसटीची सेवा सुरळीत झाली. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक वाहनांनी प्रवास करण्यावर भर दिला. जुन्या चारचाकी खरेदीचे प्रमाण वाढले. त्यामुळे ‘एसटी’ची प्रवासी संख्या कमी झाली. डिझेल भरण्यासाठीही पैसे नसल्याची स्थिती काही आगारांची झाली होती. अशा परिस्थितीत गतवर्षी २२३ आणि यावर्षी मागील ४५ दिवस एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला आर्थिक फटका बसला. जिल्ह्यात एसटी महामंडळाचे तब्बल २ हजार ९०० कर्मचारी आहे.
रोज ५० लाख रुपयांचे नुकसान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी लाॅकडाऊन हाेते. जवळपास २२३ दिवस बससेवेवर परिणाम झाला. यातून १११ कोटींचे नुकसान झाले. यावर्षी गेल्या ४५ दिवसांत २२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या कालावधीत प्रत्येक दिवसाला साधारण ५० लाख रुपयांचे नुकसान झाले.
-अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ
जिल्ह्यातील ‘एसटी’च्या नुकसानीची स्थिती
- वर्ष २०२०
-नुकसानीचे दिवस - २२३
-एकूण नुकसान - १११ कोटी
- वर्ष २०२१
- नुकसानीचे दिवस - ४५
- एकूण नुकसान - २३ कोटी
जिल्ह्यातील स्थिती
- एकूण बस - ५५०
- चालक - १,२१३
- वाहक - ९३१
- एकूण कर्मचारी - २,९००
- कोरोनापूर्वी रोजच्या फेऱ्या - ६,२२२
एकट्या मध्यवर्ती बसस्थानकाची स्थिती
- रोजचे नुकसान - १५ ते २० लाख रुपये
- चालक - २५६
- वाहक - १७७
- एकूण कर्मचारी - ५५३