बसथांब्यांची दुरवस्था
By Admin | Published: September 20, 2014 12:11 AM2014-09-20T00:11:43+5:302014-09-20T00:27:33+5:30
वाळूज महानगर : वाळूज महानगरातील बसथांबे मोडकळीस आले असून, सभोवताली काटेरी झुडपे, गवत वाढल्याने बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे.
वाळूज महानगर : वाळूज महानगरातील बसथांबे मोडकळीस आले असून, सभोवताली काटेरी झुडपे, गवत वाढल्याने बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसथांबे जनावरांचे कुरण बनले आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थी व नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात
आहे.
सिडको वाळूज महानगरातील बसथांबा मोडकळीस आला असून, विद्यार्थी व प्रवाशांना बसण्यासाठी जागाच नाही. बसथांब्याभोवती काटेरी झाडेझुडपे व गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गवत खाण्यासाठी मोकाट जनावरांचा येथे मुक्त संचार असतो.
विद्यार्थी व प्रवाशांना रस्त्यावरच कधी भर उन्हात, तर कधी पावसात ताटकळत उभे राहावे लागत आहे. साप, घूस इ. सरपटणारे प्राणी याठिकाणी वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे येथे उभे राहणेही धोक्याचे ठरत आहे.
शिवाय मोकाट जनावरे बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थिनी व महिलांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे त्यांना येथे उभे राहणेही अवघड झाले आहे. मोरे चौक व महाराणा प्रताप चौकातील बसथांब्याचे नुसते अवशेष शिल्लक आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना चौकातच वाहनांच्या गर्दीत बसची प्रतीक्षा करीत उभे राहावे लागत आहे.
वाळूज महानगरातील विद्यार्थी व नागरिकांची शहरात सतत ये-जा सुरू असते. अनेक वेळा मागणी करून प्रशासन बसथांब्यांच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
संबंधित प्रशासनाने लवकर या बसथांब्याची दुरुस्ती करून बसण्याची व्यवस्था करावी व परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी त्रस्त विद्यार्थी व नागरिकांमधून केली जात
आहे.