गुलमंडी भागात सर्वाधिक वर्दळ; वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:02 AM2021-07-18T04:02:27+5:302021-07-18T04:02:27+5:30
औरंगाबाद : शहराचे हृदयस्थान असलेल्या गुलमंडीवर नागरिक विविध सामान खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र, नागरिकांसाठी फुटपाथची स्वतंत्र व्यवस्थाच मागील ...
औरंगाबाद : शहराचे हृदयस्थान असलेल्या गुलमंडीवर नागरिक विविध सामान खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र, नागरिकांसाठी फुटपाथची स्वतंत्र व्यवस्थाच मागील काही वर्षांमध्ये केलेली नाही. फुटपाथ या भागात शोधूनही सापडत नाही. वाहनांची प्रचंड वर्दळ असते. अशा परिस्थितीत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. महापालिकेने यापूर्वी अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मनपाचे पथक परत जाताच पुन्हा अतिक्रमणे जैसे थे होतात.
स्मार्ट सिटी योजनेत पैठण गेट ते गुलमंडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने पीपल फॉर स्ट्रीट संकल्पना राबविण्यात येणार आहे. या भागात वाहनांची वर्दळ पूर्णपणे बंद करण्याचा विचार मनपाचा आहे. मात्र, गुलमंडीसाठी अशी कोणतीही योजना सध्या मनपा किंवा स्मार्ट सिटी प्रशासनाकडे नाही. मछलीखडक, रंगारगल्ली, कुंभारवाडा, सुपारी हनुमान मंदिर परिसर, गुलमंडी पार्किंग परिसरात नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. अनेकदा दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे किरकोळ अपघातही होतात.
रोज लाखो लोकांची ये-जा
गुलमंडी परिसरात दररोज लाखो नागरिक खरेदीसाठी येतात. शहरातील कोणत्याही भागात राहणारा नागरिक गुलमंडीवर विविध वस्तू खरेदीसाठी हमखास येतोच. सध्या कोरोना निर्बंधांमुळे मार्केट दुपारी ४ वाजताच बंद होते. पूर्वी नागरिकांची गर्दी रात्री १० पर्यंत राहत होती. आता सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत प्रचंड वर्दळ असते. अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
फुटपाथ कागदावरच
शहरातील प्रत्येक रस्त्याला फुटपाथ असतोच. महापालिकेच्या कागदावरही या भागात फुटपाथ आहेत. प्रत्यक्षात एकही फुटपाथ दिसत नाही. प्रत्येक फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. व्यापाऱ्यांची अतिक्रमणे, त्यानंतर फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात दिसून येते. पायी चालणाऱ्यांना जागाच शिल्लक राहत नाही.
अतिक्रमण हटाव मोहीम नावालाच
महापालिकेकडून वर्षभरापूर्वी गुलमंडी, रंगारगल्ली भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. अलीकडेच कुंभारवाड्यातही मोहीम राबविली. यानंतर परिस्थितीत किंचितही सुधारणा झालेली नाही. मनपाचे पथक निघून जाताच अतिक्रमणे पुन्हा जशास तशी असतात. वाहतुकीला, पादचाऱ्यांना त्रास होणार नाही, एवढा मोठा रस्ता मोकळा असायला हवा.
सहकुटुंब चालणे अवघड
लहान मुलांसह गुलमंडीवर पायी ये-जा करणे अशक्य आहे. वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मुलांना एका ठिकाणी थांबवून खरेदी करावी लागते. पायी चालण्यासाठी तरी या भागात व्यवस्था असायला हवी. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
अभिजीत वाघुंडे, नागरिक
ग्राहकांची अडचण समजून घ्यावी
गुलमंडीवरील व्यापाऱ्यांनीही ग्राहकांची अडचण समजून घ्यावी. ग्राहकाला दुकानासमोर वाहन उभे करायला कुठेच जागा मिळत नाही. पार्किंगची व्यवस्था नाही. चारचाकी वाहन परिसरात कुठे उभे करावे. वाहन उभे करून खरेदीला गेल्यावर दुसरे वाहनधारक अंगावर येतात. या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा.
अब्दुल माजीद, नागरिक
अधूनमधून कारवाई
गुलमंडी, रंगारगल्ली, कुंभारवाडा, औरंगपुरा रोड, मछलीखडक आदी भागात नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अधूनमधून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येते. मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन, कोरोना परिस्थितीमुळे कारवाई झालेली नाही. बाजारपेठही ४ वाजताच बंद होते. पूर्णवेळ बाजारपेठ सुरू झाल्यावर पुन्हा मोहीम हाती घेतली जाईल.
रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा.