सर्वात वर्दळीच्या क्रांतीचौकात चोरट्यांचा धुमाकूळ, चार शटर उचकटून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 07:02 PM2020-08-10T19:02:56+5:302020-08-10T19:04:41+5:30
कार्यालयात फुटलेल्या काचांचा खच पडला होता. या कार्यालयातील हार्ड डिस्क आणि मोबाईल चोरट्यांनी नेला.
औरंगाबाद : रात्रंदिवस वर्दळीच्या क्रांतीचौकातील चार शटर उचकटून चोरट्यांनी रोख ५ हजार ५०० रुपये, मोबाईल आणि संगणकाची हार्ड डिस्क चोरून नेली, तर जुना मोंढ्यातील खाद्यतेलाचे दुकान फोडणाऱ्या दोन चोरट्यांना गस्तीवरील पोलिसांनी रंगेहात पकडले. या दोन्ही घटना रविवारी रात्री १ ते पहाटे ४ या वेळेत झाल्या. या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचे शिवराज असोसिएट आणि शिवराज केबल ब्रॉडबॅण्ड अॅण्ड इंटरनेट प्रा. लि. ही दोन कार्यालये क्रांतीचौक पेट्रोलपंपाशेजारील गल्लीत आहेत. त्यांचा व्यवस्थापक विजय खंडागळे आणि कर्मचाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी कार्यालये बंद केली आणि ते घरी गेले. रविवारी मध्यरात्री दोन्ही कार्यालयाचे शटर उचकटून चोरटे आत घुसले. शिवराज ब्रॉडबॅण्ड कार्यालयातील आलमारीतील रोख ५ हजार ५०० रुपये चोरून नेले व दोन्ही कार्यालयांतील सामान अस्ताव्यस्त फेकले. तेथे अधिक रक्कम न मिळाल्याने चोरट्यांनी त्यांचा मोर्चा या कार्यालयासमोरील इराणी कॅफेकडे वळवला.
या कॅफेच्या तळमजल्यातील कॅड एज दुकानाचे शटर उचकटून आत घुसले. तेथेही रोख रक्कम नव्हती. किमती ऐवज न मिळाल्याने चोरटे पहिल्या मजल्यावरील इराणी कॅफेत घुसले. या कॅफेच्या काऊंटरचे लॉकर तोडून त्यांनी शोधाशोध केली. मात्र, लॉकडाऊनपासून कॅफे बंद असल्याने तेथे निव्वळ धूळच होती. नंतर चोरट्यांनी कॅफेच्या वरच्या मजल्यावरील वेलवर्थ क्रिएटिव्ह मीडिया या जाहिरात कंपनीचे कार्यालय फोडले. कार्यालयात फुटलेल्या काचांचा खच पडला होता. या कार्यालयातील हार्ड डिस्क आणि मोबाईल चोरट्यांनी नेला. अरविंद हौजवाला यांच्या केबिनमधील सामान अस्ताव्यस्त केले. सोमवारी सकाळी शेजारील कुटुंब सुभाष नगरकर यांना शटर उचकटलेले दिसल्यावर त्यांनी जंजाळ यांना फोन करून घटना कळविली.