फुटपाथवर व्यवसायिकांचे बस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:01 PM2019-03-24T23:01:59+5:302019-03-24T23:02:21+5:30

वाळूज व पंढरपुरात फुटपाथवरच विविध व्यवसायिकांनी बस्तान मांडले आहे.

 Business bust on footpath | फुटपाथवर व्यवसायिकांचे बस्तान

फुटपाथवर व्यवसायिकांचे बस्तान

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज व पंढरपुरात फुटपाथवरच विविध व्यवसायिकांनी बस्तान मांडले आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे महामार्गावर रहदारीस अडथळा निर्माण होत असून, वाहतुकीची कोंडी होत आहे. फुटपाथ गायब झाल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून वाहतूक कोंडीतून मार्ग काढत ये-जा करावी लागत आहे.


औरंगाबाद-नगर महामार्गावर असलेल्या वाळूज व पंढरपूर येथे दिवसेंदिवस रस्त्यालगत अतिक्रमण वाढत आहे. पादचाऱ्यांसाठी महामार्गालगत स्थानिक प्रशासनाने फुटपाथ तयार केले. मात्र या फुटपाथचा वापर व्यवसायासाठी केला जात असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. फुटपाथवर हातगाडी चालक भाजीपाला-फळ विक्रेते, हॉटेल, पानटपरी, ज्यूस सेंटर, गॅरेज आदी व्यवसायिकांनी व्यवसाय थाटले आहेत. पादचाऱ्यांना पर्यायी रस्ता नसल्यामुळे जीव धोक्यात घालून महामार्गावरील वाहतूक कोंडीतून मार्ग काढत ये-जा करावी लागत आहे.

यात रस्ता ओलांडताना तसेच ये-जा करताना झालेल्या अपघाताच्या घटनेत अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. तरीही प्रशासनाकडून हे अतिक्रमण हटविले जात नाही. फुटपाथवरील अतिक्रमण पादचाऱ्यांच्या जिवावर बेतत असून वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनले आहे. संबंधित प्रशासनाने फुटपाथवरील अतिक्रमण तात्काळ हटवून रहदारीसाठी रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.


अपघाताचा धोका बळावला ..
वाढत्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी सारखी वाहतूक कोंडी होत आहे. स्थानिक प्रशासनाकडूनही त्यांच्यावर कारवाई करण्यास चालढकलपणा केला जातो. पण दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ होत असल्याने अपघाताचा धोका अधिक बळावला गेला आहे.

Web Title:  Business bust on footpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.