'व्यवसाय बंद,घर चालवावे कसे'; ब्युटी पार्लर व्यवसायासह नाभिक समाज बांधव संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 03:15 PM2021-04-24T15:15:22+5:302021-04-24T15:15:47+5:30

वुमेन हेल्पलाईन फाउंडेशनतर्फे नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

'Business closed, how to run a house'; Nuclear society brothers in crisis with beauty parlor business | 'व्यवसाय बंद,घर चालवावे कसे'; ब्युटी पार्लर व्यवसायासह नाभिक समाज बांधव संकटात

'व्यवसाय बंद,घर चालवावे कसे'; ब्युटी पार्लर व्यवसायासह नाभिक समाज बांधव संकटात

googlenewsNext
ठळक मुद्देसंचारबंदी, लॉकडाऊनमुळे नाभिक समाज बांधवांच्या व्यवसायावर खूप परिणाम झाला आहे.

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या प्रदीर्घ झळा सोसल्यानंतर आता कुठे व्यवसायाला सुरुवात झाली होती. मात्र, पुन्हा लॉकडाऊन लागले आणि व्यवसायाला खीळ बसली. यामुळे ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिला आणि नाभिक समाज बांधव पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले असून, आम्हालाही शासनाने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

वुमेन हेल्पलाईन फाउंडेशनतर्फे नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. वुमेन हेल्पलाईन फाउंडेशनच्या मराठवाडा अध्यक्षा शीतल थोरात यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मजूर, कामगार, रिक्षाचालक व इतर उद्योगांना जशी आर्थिक मदत केली आहे, तशीच मदत ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलांनाही करावी. अनेक महिलांनी कर्ज काढून ब्युटी पार्लर सुरू केले आहे. त्यांचे बँकांचे हप्ते चालू आहेत. हप्ता नाही भरला तर वसुलीसाठी बँकेतून वारंवार फोन येत आहेत. उत्पन्न बंद असल्याने हप्ते कसे भरावे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न या महिलांना पडला आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलांना दरमहा १० हजार रुपये किंवा जोपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे, तोपर्यंत मोफत अन्नधान्य वाटप करावे किंवा मग ब्युटी पार्लर चालविण्याची परवानगी द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

नाभिक समाजाला द्या आर्थिक पॅकेज
संचारबंदी, लॉकडाऊनमुळे नाभिक समाज बांधवांच्या व्यवसायावर खूप परिणाम झाला आहे. नाभिक समाजाला उत्पन्नाचा दुसरा कोणाताही पर्याय नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. डोक्यावरचे वाढते कर्ज, बेरोजगारी, उपासमारी यामुळे नाभिक समाजातील २५ कुटुंबप्रमुखांनी आत्महत्या केल्या आहेत. या कुटुंबांना अद्याप शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. नाभिक समाजातील सलून व्यावसायिक, कारागीर यांना काही निकषांवर सरसकट अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी करणारे निवेदन सकल नाभिक समाजातर्फे सुशील बोर्डे, मंगेश सोनवणे, सचिन गायकवाड, दीपक वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले.

Web Title: 'Business closed, how to run a house'; Nuclear society brothers in crisis with beauty parlor business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.