शांतता राहिली तरच व्यवसायवृद्धी; शहराच्या कायदा सुव्यवस्थेसाठी व्यापाऱ्यांचे पोलिसांना सहकार्य
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 9, 2023 08:02 PM2023-06-09T20:02:57+5:302023-06-09T20:03:10+5:30
रेस्टॉरंट, बार, हॉटेलमालकांची पुन्हा होणार बैठक
छत्रपती संभाजीनगर : अचानकपणे पोलिस विभागाने शहरात रात्री ११ वाजता बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तो लागूही केला. मात्र, याबद्दल व्यापारी संघटनांना विचारात घेतले नाही. थेट आदेश लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. ‘लोकमत’ने हा मुद्दा ऐरणीवर आणला होता. याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी लगेच गुरुवारी दुपारी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी पोलिस आयुक्तालयात तातडीने बैठक घेतली. शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली, तरच येथील व्यवसायाची वृद्धी होईल. या मुद्यावर व्यापारी प्रतिनिधींनी पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबाद हॉटेल्स असोसिएशन व जिल्हा हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिशएनने मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली. याविषयी येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले. पोलिस आयुक्तांनी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून आमचे म्हणणे ऐकून घेतले व सकारात्मक चर्चा झाली. यामुळे व्यापारी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले व ‘लोकमत’चे आभारही मानले.
जे शहर शांत असते, तिथेच व्यवसाय वाढतो
जे शहर शांत असते, जिथे गुन्हेगारी कमी असते. त्याच शहरात पर्यटक येतात. तसेच शहराचा पैसा शहरात फिरला, तर शहराची वृद्धी होते, असे नाही; पण बाहेरील पैसा जेव्हा शहरात येतो तेव्हा त्या शहराचा विकास होतच असतो.
जिथे काही टपऱ्या मध्यरात्रीपर्यंत चालतात तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे यास रोखण्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत बाजार बंदचा निर्णय पोलिसांनी घेतला, असे असेल तर पोलिसांना आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत.
-आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड काॅमर्स
पोलिसांना सहकार्य करू
रात्री ११ वाजेपर्यंतच जर दुकाने बंद केलीत अन् शहरातील कायद्या सुव्यवस्था अबाधित राहत असेल, तर जिल्हा व्यापारी महासंघ पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे. कापड व्यावसायिक व अन्य व्यावसायिकांनी ११ वाजता दुकानाचे शटर खाली करावे व नंतर त्यांना दुकानात कपड्यांच्या घडी घालणे, दुकान स्वच्छतेचे काम करू द्यावे, १२ वाजेपर्यंत काम आटोपून ते व्यापारी- कर्मचारी घरी जातील, या मागणीस पोलिस आयुक्तांनी सकारात्मकपणे घेतले.
पुन्हा एकदा होणार बैठक
पोलिस प्रशासनाला आम्ही नेहमीच सहकार्य करत आहोत व पुढेही करू; पण हॉटेल, रेस्टॉरंट, बार ॲण्ड परमिट रूम मध्यरात्री दीड वाजेपर्यंत चालू ठेवावेत, अशी मागणी आम्ही पोलिस आयुक्तांना केली. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊ. त्यात पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.
-शिवाजी पाटील,अध्यक्ष, जिल्हा हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन्स