पर्यटकांनी पाठ फिरवल्याने हॉटेल उद्योगाचा व्यवसाय अर्ध्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:52 PM2019-08-01T12:52:41+5:302019-08-01T13:13:34+5:30
उन्हाळा, विमानाच्या कमतरतेचा फटका
औरंगाबाद : मागील चार महिने हॉटेल उद्योगासाठी अत्यंत कठीण गेले. उन्हाळा, त्यात मुंबईचे विमान रद्द झाले, थेट शिर्डीत विमानसेवा सुरू, तसेच ऑटोमोबाईल हबमधील मंदी या सर्वांचा परिपाक म्हणून येथील हॉटेल उद्योगाचा व्यवसाय ५० टक्क्यांपर्यंत घटला आहे. मात्र, आता सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात पुन्हा एकदा, मुंबई- औरंगाबाद विमानसेवा सुरू होण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू झाल्याने पुढील हंगाम चांगला राहील, अशी आशा हॉटेल उद्योगात निर्माण झाली आहे.
औरंगाबादेत लहान-मोठे मिळून सुमारे १५० पेक्षा अधिक हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग आहेत. यात पंचतारांकित हॉटेलांचाही समावेश आहे. सर्व मिळून सरासरी २,३०० खोल्या आहेत. येथील जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी विदेशातील पर्यटक शहरात येतात, तसेच धार्मिक पर्यटकही येथे मोठ्या प्रमाणात येतात. देशविदेशांतूनही औद्योगिक पर्यटकही येत असतात. जून ते जानेवारी हा येथील पर्यटनाचा हंगाम असतो. मात्र, मार्च महिन्यात मुंबई- औरंगाबाद जेट विमानसेवा बंद पडली. त्यात शिर्डी येथे नवीन विमानतळ सुरू झाले, तसेच ऑटोमोबाईल उद्योगातील मंदी या सर्वांचा फटका येथील हॉटेल उद्योगाला बसला.
उन्हाळ्यात औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटक कमीच येतात. मात्र, या वेळेस ५० टक्क्यांपर्यंत व्यवसाय घटल्याचे या उद्योगातील व्यवस्थापकांनी सांगितले. २,३०० खोल्या आहेत, त्यापैकी निम्म्या खोल्या रिकाम्या राहत होत्या. एवढेच नव्हे तर रेस्टॉरंटमधील व्यवसायही ६० टक्क्यांपर्यंत कमी झाला. पंचतारांकित हॉटेलानांही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शहरातील पाणीटंचाई, कचरा, तसेच अजिंठ्याच्या रस्त्याची लागलेली वाट याची माहिती सतत सोशल मीडियामुळे अपटेड होत असते.
पर्यटक सोशल मीडियातील बातम्या वाचून शहरात येणे टाळत असल्याचेही या क्षेत्रातील व्यवस्थापकांनी सांगितले. पर्यटकांची संख्या घटल्याचा परिणाम, हॉटेल उद्योगासोबत अन्य व्यवसायांवरही झाला आहे.
मात्र, आता देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी विमानांची संख्या वाढवून राजस्थान, दिल्ली आणि मुंबईची एअर कनेक्टिव्हिटी बळकट करण्याच्या मागणीसाठी टूर आॅपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या नवीन हंगामाआधी जर नवीन विमानसेवा सुरू झाल्या, तर पर्यटकांची संख्या वाढेल व हॉटेलसह संपूर्ण पर्यटन उद्योगाला फायदा होईल, असा विचार हॉटेल उद्योगातून व्यक्त केला जात आहे.
मुंबई, दिल्ली विमानतळांकडून उड्डाणाची वेळ हवी https://t.co/NcH636aOfm
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) July 31, 2019
शहरातील पर्यटनस्थळांचा विकास महत्त्वाचा
वेरूळ, अजिंठा, देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा यामुळे पर्यटनाची राजधानी म्हणून औरंगाबाद ओळखले जाते; पण पर्यटक जास्त दिवस थांबण्यासाठी शहरातही पर्यटनस्थळे विकसित होणे आवश्यक आहे. यासाठी सलीम अली सरोवर, हिमायत बाग, सिद्धार्थ गार्डन चांगले विकसित होऊ शकते. सलीम अली सरोवर लेजर शो, फूड प्लाझा, तसेच नौकाविहार सुरू केला, तर पर्यटक येथे मुक्काम करू शकतात. पूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलियातूनही पर्यटक शहरात येत असत. मात्र, त्यांची संख्या आता नगण्य राहिली आहे. मागील चार महिने तर हॉटेल उद्योगाला खूप कठीण गेले.
-गुरुप्रीतसिंग बग्गा, हॉटेल व्यावसायिक
एअर कनेक्टिव्हिटी वाढली, तरच पर्यटन उद्योग बहरेल
एअर कनेक्टिव्हिटी वाढली, तरच येथील पर्यटन उद्योग बहरेल. यासाठी टूर आॅपरेटर, उद्योजक व व्यावसायिकांनी मुंबई, दिल्ली, औरंगाबाद विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यास विमान कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या दिल्ली आणि मुंबई विमानतळाकडून स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळत नाही. मात्र, नवीन पर्यटन हंगाम सप्टेंबर महिन्यात सुरू होतो. त्याआधी विमानसेवा सुरू करण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्नशील आहोत.
-जसवंतसिंह राजपूत, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलमपेंट फोरम