उद्योजकाचे फेसबुक अकाऊंट हॅक; २१४ जणांसोबत ‘चॅट’ करून पैशांची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 06:28 PM2020-06-25T18:28:05+5:302020-06-25T18:33:46+5:30
लॉकडाऊनमुळे अडचणीत आलो असून, पैशांची गरज असल्याचे ‘चॅट’ केले
औरंगाबाद : उद्योजकाचे फेसबुक अकाऊंट हॅक करून मेसेंजरच्या माध्यमातून तब्बल २१४ जणांसोबत चॅटिंग करून लॉकडाऊनमुळे अडचणीत आलो आहे, पैसे पाठवा, असे मेसेज पाठविले. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने उद्योजकाने तात्काळ फेसबुकचा पासवर्ड बदलून टाकला आणि भामट्याविरुद्ध सायबर ठाण्यात तक्रार नोंदविली.
वाळूज एमआयडीसी आणि उस्मानाबाद येथे उद्योग करणाऱ्या अशोक शेळके याचे फेसबुक अकाऊंट मंगळवारी सकाळी हॅक करण्यात आले. यानंतर हॅकर्सने फेसबुकवरील २१४ मित्रांना मेसेंजरद्वारे अशोक शेळके यांच्या नावे चॅटिंग सुरू केली. या चॅटिंगमध्ये त्याने लॉकडाऊनमुळे अडचणीत आलो असून, पैशांची गरज असल्याचे नमूद केले. प्रत्येकास त्याने १० हजार, १५ हजार रुपये ‘गुगल पे’वरून पाठविण्यास सांगितले. यात काही अशोक यांचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रांनाही मेसेज पाठवून पैशांची मागणी केली. यामुळे त्यांनी थेट त्यांना फोन करून तुम्हाला एवढी काय गरज पडली. १० ते १५ हजार रुपयांची मागणी करू लागलात, अशी विचारणा केली. आपण कुणालाही पैसे मागितले नाही, असे त्यांनी सांगितल्यावर मित्रांनी त्यांच्यासोबत आताही तुझ्या अकाऊंटवरून चॅटिंग सुरू असल्याचे सांगितले. एका मित्राने तर चॅटिंगचा स्क्रीन शॉट अशोक यांना पाठविला. तेव्हा आपले फेसबुक अकाऊंट कुणीतरी हॅक करून पैशांची मागणी करीत असल्याचे अशोक यांना समजले. यानंतर त्यांनी त्यांचे बँकेशी संपर्क साधून व्यवहार बंद ठेवण्याची सूचना केली. मित्र सुनील वाढेकर यांच्या मदतीने फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड बदलून टाकला. सर्व मित्रांना फोन करून आणि मेसेज पाठवून त्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे आणि हॅकर्सने चॅटिंग करून पैशांची मागणी केल्याचे सांगितले. सुदैवाने त्यांच्या एकाही मित्राने हॅकर्सच्या म्हणण्यानुसार पैसे पाठविले नाहीत. आज त्यांनी थेट सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली आहे.
पासवर्ड स्ट्राँग ठेवल्यास अकाऊंट हॅक होत नाही
याविषयी सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल जाधव म्हणाले की, फेसबुक या समाजमाध्यमावर खाते उघडताना युजर त्यांचा पासवर्ड मोबाईल क्रमांक अथवा अत्यंत सोपा असा ठेवतात. गुन्हेगार याचाच गैरफायदा घेऊन अकाऊंट हॅक करून फेसबुकवरील मित्रांना मेसेज पाठवून पैशांची मागणी करतात. असे प्रकार टाळण्यासाठी वापरकर्त्यांनी त्यांच्या अकाऊंटचा पासवर्ड अत्यंत मजबूत असा ठेवणे गरजेचे आहे.