चालढकलीसाठी ‘बसपोर्ट’चे गाजर
By Admin | Published: October 4, 2016 12:32 AM2016-10-04T00:32:13+5:302016-10-04T00:48:38+5:30
औरंगाबाद : पर्यटनाची आणि मराठवाड्याची राजधानी, अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमुळे जगविख्यात आणि आता स्मार्ट सिटी म्हणून औरंगाबाद शहराची ओळख निर्माण होत आहे
औरंगाबाद : पर्यटनाची आणि मराठवाड्याची राजधानी, अजिंठा आणि वेरूळ लेण्यांमुळे जगविख्यात आणि आता स्मार्ट सिटी म्हणून औरंगाबाद शहराची ओळख निर्माण होत आहे; परंतु याच शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था या सर्वांना लाजवेल अशी झाली आहे. छताची परिस्थिती पाहून बसस्थानक कोसळतेय काय? या भीतीने पर्यटक आणि प्रवाशांच्या अंगावर काटा उभा राहतो; परंतु याकडे दुर्लक्ष करून मागील दहा वर्षांपासून सुसज्ज बसस्थानक बांधण्याचे ‘गाजर’एस.टी. महामंडळाकडून दाखविण्यात आले. सुसज्ज बसस्थानकानंतर आता बसपोर्ट उभारणार असल्याचे म्हणत चालढकल करीत आहे.
महाराष्ट्रातील शहरे, खेडोपाडी आणि परराज्यांमधून दररोज हजारो प्रवासी, पर्यटक शहरातून ये-जा करतात. मध्यवर्ती बसस्थानकात दररोज दिवसभरात सातशेपेक्षा अधिक बसेस आणि २० ते २५ हजार प्रवासी ये-जा करतात; परंतु हेच बसस्थानक आज समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या दहा वर्षांत या बसस्थानकाची पार दुरवस्था झाली आहे. जागोजागी छताचे प्लास्टर उखडले आहे. एवढ्यावरच ही परिस्थिती थांबलेली नसून थेट प्रवाशांच्या अंगावर प्लास्टर पडण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे छतामधील लोखंडी गजही उघडे पडले आहेत. पावसामुळे बसस्थानकातील छत, खांब आणि भिंतीमधून पाणी झिरपत आहे.
बसस्थानकाची इमारत अधिक धोकादायक बनत आहे. ही सर्व अवस्था पाहून बसस्थानक कोसळतेय काय, अशी चिंता प्रवाशांमधून व्यक्त होते. याकडे दुर्लक्ष करून महामंडळ केवळ उत्पन्न मिळविण्यावर भर देत असल्याच्या संतप्त भावना प्रवाशांमधून व्यक्त होतात. मागील दहा वर्षांपासून अद्ययावत बसस्थानक बांधण्याचे ‘गाजर’ महामंडळाक डून दाखविण्यात आले, तर त्यानंतर आता बसपोर्ट उभारण्याची घोषणा करण्यात आली; परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा संयम सुटत आहे.