बसपोर्ट, मॉडेल स्टेशनचे काम रखडले; औरंगाबादच्या वाहतूक क्षेत्राच्या विकासाला कोरोनामुळे खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 06:49 PM2020-11-03T18:49:19+5:302020-11-03T18:52:11+5:30
बसपोर्ट, मॉडेल स्टेशनचा दुसरा टप्पा, नव्या विमानसेवा, आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा लांबणीवर
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : बससेवा, रेल्वे, विमान या दळणवळण सुविधा परिपूर्ण असल्यावर कोणत्याही शहराचा विकास फास्ट ट्रॅकवर येतो. औरंगाबादेत वाहतूक क्षेत्रासाठी अनेक नव्या गोष्टींची घोषणा झाली. मात्र, काही गोष्टी अर्धवट राहिल्या, तर काही कागदावरच. त्यात आता कोरोनाचाही फटका. त्यामुळे वाहतूक क्षेत्राच्या विकासाला खीळ बसली आहे.
औरंगाबादेत सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले; परंतु अद्यापही हे काम सुरू झालेले नाही. मध्यवर्ती बसस्थानकाच्या नवीन इमारतीसाठी बांधकाम शुल्क माफ करावे, अशी मागणी एसटी महामंडळाने मनपाकडे केली आहे; परंतु मनपाने त्यासंदर्भात निर्णय न घेतल्याने बसस्थानक उभारणीच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. विभाग नियंत्रण अरुण सिया म्हणाले, कोरोनामुळे बसपोर्ट, बसस्थानक उभारणीवर काही परिणाम होणार नाही. लवकरच काम सुरू होईल.
मॉडेल रेल्वेस्टेशनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ जुलै २०१५ रोजी दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले; परंतु अजूनही हे काम सुरूच झालेले नाही. नव्या रेल्वे सुरू होण्यासाठी ही सुविधा गरजेची आहे; परंतु कोरोनामुळे याचेही प्रत्यक्षात काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला पाहिजे.
विमानतळ सज्ज, विमानसेवा कंपन्यांनी पुढे येण्याचे आवाहन
विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली. आता विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेची प्रतीक्षा आहे. विविध देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली झाल्या होत्या; परंतु आता कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावर निर्बंध आले आहे. शहराला मुंबई, दिल्ली, हैदराबादची सध्या हवाई कनेक्टिव्हिटी आहे. किमान इतर नव्या शहरांना कधी विमानसेवा सुरू होतील, याकडे लक्ष लागले आहे. विमानतळाचे संचालक डी. जी साळवे म्हणाले, विमानतळ सेवेसाठी सज्ज आहे. विमान कंपन्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.