वैजापुरात प्रशासन ढेपाळले

By Admin | Published: June 19, 2014 12:42 AM2014-06-19T00:42:07+5:302014-06-19T00:52:38+5:30

विजय गायकवाड , वैजापूर वैजापूर शहरातील एकूण २८ विविध शासकीय कार्यालयांपैकी २२ शासकीय कार्यालयांचे प्रमुख मुख्यालयी राहत नसल्याची बाब समोर आली आहे.

Busted administration at Vaijapur | वैजापुरात प्रशासन ढेपाळले

वैजापुरात प्रशासन ढेपाळले

googlenewsNext

विजय गायकवाड , वैजापूर
वैजापूर शहरातील एकूण २८ विविध शासकीय कार्यालयांपैकी २२ शासकीय कार्यालयांचे प्रमुख मुख्यालयी राहत नसल्याची बाब समोर आली आहे. २८ पैकी फक्त सहाच कार्यालय प्रमुख मुख्यालयी राहतात. अन्य शासकीय कार्यालय प्रमुख दांड्या मारताना दिसून येतात. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील शासकीय कार्यालयांचा कारभार असाच रामभरोसे सुरू आहे.
वैजापूर शहरात एकूण २८ विविध शासकीय कार्यालये आहेत. यामध्ये उपविभागीय अधिकारी, तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती, नगर परिषद, लागवड अधिकारी, उपविभागीय कृ षी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन चिकित्सालय, उपजिल्हा रुग्णालय, बांधकाम उपविभाग, नांदूर-मधमेश्वर कालवा विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, जिल्हा परिषद सिंचन, जिल्हा परिषद बांधकाम, तालुका वजन-मापे निरीक्षक, उपअधीक्षक भूमी अभिलेख, दुकाने व संस्था निरीक्षक , दुय्यम निबंधक, लघु पाटबंधारे स्थानिक स्तर, महावितरण कंपनी क्र. १ व २, दूरसंचार विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, तालुका आरोग्य अधिकारी व पंचायत समिती शिक्षण विभाग या कार्यालयांचा समावेश आहे.
या २८ पैकी उपविभागीय अधिकारी, तहसील, पोलीस ठाणे, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी असे एकूण सहाच कार्यालय प्रमुख मुख्यालयी राहतात. उर्वरित २२ कार्यालयांचे प्रमुख अमावास्या- पौर्णिमेला येऊन शहरातील कार्यालयात हजेरी लावतात.
वास्तविक पाहता सर्वच कार्यालय प्रमुखांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. तसे शासन परिपत्रकच निर्गमित करण्यात आले आहे. या सर्व अधिकाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळतो; परंतु अधिकारी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून चुना लावीत आहेत. शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांचे प्रमुख आठवडी बाजाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी हजेरी लावताना दिसून येतात. आठवड्यातील उर्वरित दिवसांत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मर्जीनुसार कामकाज चालते. त्यामुळे अन्य दिवशी बहुतांश वेळा अधिकाऱ्यांच्या कार्यालयास दांड्याच असतात.
अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी
हे सर्वच अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वैजापूर येथील शासकीय कार्यालयांचा कारभार ‘आओ जाओ घर तुम्हारा’ यानुसार सुरू आहे.
त्यांच्यावर ना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधींचा. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे तालुक्यातील नागरिक नाहकपणे वेठीस धरले जात आहेत.
आठवडी बाजाराच्या दिवशीच हजेरी
वैजापूर शहरात बहुतांश कार्यालय प्रमुखांना आठवडी बाजाराच्या दिवशी हजर राहून काम करण्याची सवय झाली आहे. आठवडी बाजाराच्या निमित्ताने नागरिक शासकीय कामांसाठी येत असले तरी या दिवशी नागरिकांचा लोंढा जास्त प्रमाणात येत असल्याने कामांचा निपटारा न होता जास्तीत जास्त कामे प्रलंबित राहतात. कामाचा निपटारा करण्यासाठी कार्यालय प्रमुखांनी आठवडाभर सातत्याने कार्यालयात हजर राहणे गरजेचे आहे; परंतु या ‘आठवडी’ अधिकाऱ्यांच्या मनमानी व गलथान कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर कामे प्रलंबित राहतात. त्यांच्या या कारभारावर लगाम घालणे गरजेचे आहे.

Web Title: Busted administration at Vaijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.