अचानक लागलेल्या आगीत पाच वाहने व फ्रिज रिपेरिंग दुकान भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 06:54 PM2017-11-14T18:54:19+5:302017-11-14T18:55:37+5:30
जिन्सी पोलीस ठाण्याच्या समोरील रिकाम्या जागेवर अचानक आग लागली. या आगीत ५ वाहने तसेच फ्रिज रिपेरिंगच्या दुकानातील फ्रिज जळून राख झाले
औरंगाबाद: जिन्सी पोलीस ठाण्याच्या समोरील रिकाम्या जागेवर अचानक आग लागली. या आगीत ५ वाहने तसेच फ्रिज रिपेरिंगच्या दुकानातील फ्रिज जळून राख झाली आहेत. या ठिकाणी आता फक्त पत्र्याचे सांगाडेच दिसतात. आगी जवळील इतर वाहने नागरिकांनी वेळीच बाजूला काढल्याने व वेळीच अग्नीशामक विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. रिकामी जागा असल्याने या रस्त्यावर ट्रक, टेम्पो,रिक्षा, लोडींग वाहने उभी केली जातात.येथे कच-याचे ढिगारे देखील असून आग लागण्याचे कारण अद्यापही पोलिसांनाही कळले नाही. आगीचा रौद्रावतार वाढला अन् फ्रिजच्या दुकानातील १५ डीप फ्रीज व किमान ४० च्या जवळपास लहाने फ्रिज होते. ते ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, आगीच्या जवळ असलेली इतर वाहने नागरिकांनी काचा फोडून आगीपासून दुर हटविली. यानंतर अग्निशामक दलाच्या बंबाने पाण्याच्या मारा करून आग शमविला. परंतु, तोपर्यंत गाड्यांच्या सांगडाच उरला.
पाच वाहने जळाली
आॅटो रिक्षा(एम.एच. २० एए३६१३)ही लोडींग अॅपे रिक्षा (एमएच २०एटी ४०८८), टेम्पो ४०७ (एमएच २० ए ५६१०) जाळाल्या तर आणि एक मॅजीक (एम.एच. २०सीएस ६४१६) ही देखील आगीत थोडीफार जळाली आहे. मारूती कारचा तर नंबर देखील कुणाला सांगता आला नाही. स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आल्याने बहुतांश चारचाकी वाहने नागरिकांनी काचा फोडून आगीपासून दुर काढल्याने त्या गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून बचावल्या.
आगीचे कारण गुलदस्त्यात...
जिन्सीच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी नियमितपणे विविध गाड्या पार्क केलेल्या असतात. यामुळे येथे अचानक आग लागली कि लावण्यात आली याचे कारण पोलिसांनी उशीरापर्यंत स्पष्ट केले नाही. पोलिसांनी आगीच्या घटनेची फक्त नोंद घेतली असून, कुणीही सायंकाळपर्यंत तक्रार देण्यासाठी पुढे आले नसल्याचे जिन्सी पोलिसांनी सांगितले. आगीची खबर मिळताच गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात व त्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
रोजगार बुडाला...
शेख अब्दुल सलीम अॅपे रिक्षा चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. रिक्षा आगीत जळाल्याने रोजगारच बुडाला असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसापूर्वीच रिक्षाची पासिंग करून आणली आहे. हे नैसर्गिक संकट आल्याने पुन्हा बेरोजगारीची कु-हाड नशीबी पडल्यागत झाल्याचे शेख म्हणाले.
मोठे नुकसान झाले...
शेख इम्रान यांचे फ्रिज रिपेरिंगचे दुकान असून, त्यांच्याकडे डी फ्रीज १५ तर ४०च्या जवळपास लहान फ्रिज दुरूस्तीसाठी आले होते. दोन वाजेच्या सुमारास काही युवकांनी घरी येऊन सांगितले की, तुमच्या दुकानाला आग लागली. घरून दुकानापर्यंत आलो असता, आगीत सर्व दुकानाच गुरफटून गेले होते. आगी आटोक्यात आणली त्यावेळी फक्त राख अन् पत्र्याची टरफल शिल्लक राहिली. किमान दोन लाखाच्या जवळपास हाणी झाल्याचे शेख इम्रान यांनी सांगितले.
उशीरापर्यंत प्रक्रिया सुरू...
मंगळवारी सायंकाळी उशीरापर्यंत जळीत प्रकरणाचे पंचनामे करणे सुरू होते, आगीत नेमके कुणाची वाहने किती नुकसान, आगीचे कारण इत्यादी विषय हाताळण्यात येतील. या आगी प्रकरणी सध्या केवळ नोंद घेण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे पोलीस निरीक्षक हाश्मी यांनी सांगितले.