अपहरणकर्त्यांचा चार दिवसांत पर्दाफाश; पाटोदा पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 06:24 PM2018-05-16T18:24:45+5:302018-05-16T18:28:25+5:30
तालुक्यातील पाचंग्री येथील एका व्यक्तीचे घरासमोरून सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना पाटोदा पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन सिनेस्टाईल पध्दतीनेच जेरबंद केले.
पाटोदा (बीड ) : तालुक्यातील पाचंग्री येथील एका व्यक्तीचे घरासमोरून सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना पाटोदा पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन सिनेस्टाईल पध्दतीनेच जेरबंद केले. तब्बल चार दिवसांच्या अथक परिश्रमातून अपहृत व्यक्तीची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यापैकी एक लष्करी जवान, तर एक सेवानिवृत्त जवान आहे. सुरेश भैरु साळवी (रा. ताम्हणगाव, ता. कागल, जि कोल्हापूर), विजय दत्तात्रय साळुंखे (रा. चौरे, ता. कराड, जि सातारा) आणि अभिजित शिवजी चव्हाण (रा. मादयाळ, ता. कागल, जि कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना वाहनासह (एमएच-१४, एव्ही- ६४५०) अपहृत सुनील बागलसह कोल्हापूर जिल्ह्यात ताब्यात घेतले. आरोपीमधील साळवे हा सेवानिवृत्त लष्करी जवान आहे तर साळुंखे हा सेवारत जवान आहे .
१० मे रोजी सकाळी साडेसात वाजता सुनील अंकुश बागल यांचे राहत्या घरासमोरून अपहरण करण्यात आले होते. यासाठी १०-१५ जणांसह तीन वाहनांचा वापर करण्यात आला होता. सुनीलची पत्नी आरती यांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
केवळ कोल्हापूरच्या लोकांनी अपहरण केल्याची माहिती पोलिसांकडे होती. आरोपींची ठोस माहिती हाती नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. शिवाय सुनील यांचा काही घातपात तर होणार नाही ना, अशी शंका होती. आष्टीचे उपअधीक्षक डॉ अभिजित पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून सहायक निरीक्षक संजय सहाणे यांच्या नेतृत्वात पथक नियुक्त केले.
सहाणे यांनी राम बारगजे सहायक उपनिरीक्षक विष्णू जायभाय, विजय जगताप, लहू घरत, सुभाष क्षीरसागर या पथकासह तुटपुंज्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटक राज्याच्या सीमेवर हे लोक असल्याचे लक्षात आले. आजरा पोलीस ठाण्याच्या उत्तूर चौकी अंतर्गत होनाली गाव परिसरात असल्याची खात्री झाली. तेथे आरोपींना सुनीलसह पोलिसांनी ताब्यात घेतले .
साहणे यांच्या पथकाला कोल्हापूर पोलिसांची मोठी मदत मिळाली. आरोपी सातत्याने जागा बदलत होते. आरोपी कर्नाटक राज्याच्या सीमेवरील गावचे असल्याने ते कर्नाटक राज्यात जाऊन भ्रमणध्वनीचा वापर करत होते. सुनील यास केवळ घरी बोलण्यासाठी भ्रमणध्वनीचा वापर करू देत होते .आरोपींच्या शोधासाठी सहाणे व पथकाने होनाळी गावाजवळ स्मशानभूमीत मुक्काम करून परिसरातच आरोपींना जेरबंद केले.
नोकरीच्या आमिषाने फसवणूक
अपहरण केलेली व्यक्ती सुनील बागल हा मूळचा पाचंग्री येतील रहिवासी आहे. तो पुण्याला बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करतो, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र तो या व्यवसायाच्या आडून तरु णांना पोलीस, सी आर पी एफ आदी ठिकाणी भरती करण्याचे आमिष दाखवून पैसे उकळत होता. मागील पाच ते सात वर्षांपासून सुमारे ५२ उमेदवारांकडून बागल याने उपरोक्त आरोपींच्या माध्यमातून पैसे उकळले. या प्रकरणातून सुमारे दोन कोटी रुपतांचा चा व्यवहार झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले .त्यामधूनच हे अपहरण प्रकरण घडल्याचे सांगितले .