बिनधास्त जाळला जातोय कचरा!
By Admin | Published: February 3, 2017 12:40 AM2017-02-03T00:40:41+5:302017-02-03T00:41:48+5:30
लातूर : वाढत्या प्रदुषणामुळे जीवाची घालमेल होत असतानाच शहरातील काही भागात बिनधास्तपणे कचरा जाळण्यात येत आहे़
लातूर : वाढत्या प्रदुषणामुळे जीवाची घालमेल होत असतानाच शहरातील काही भागात बिनधास्तपणे कचरा जाळण्यात येत आहे़ विशेष म्हणजे, कचरा जाळणाऱ्यांना कायद्याच्या उल्लंघनाची माहिती नाही की? जाणीवपूर्वक कचरा जाळत आहेत, हे अनुत्तरीय आहे़ त्यातच महापालिकेचेही दुर्लक्ष होत असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचा धूर निघत असल्याचे दिसून येत आहे़ परिणामी, प्रदुषणात भर पडत आहे़ शहरातील प्रकाश नगर, खाडगाव रोड, आदर्श कॉलनी, खोरी गल्ली, शामनगर परिसरात बिनधास्तपणे कचरा जाळल्याचे दृश्य ‘लोकमत’च्या कॅमेऱ्याने टिपले आहे़
एकीकडे महापालिकेच्या वतीने स्वच्छ शहर, सुंदर शहर निर्माण करण्यावर भर देत असली तरी दुसरीकडे याच महापालिकेचे कचरा उचलण्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे़ स्वच्छतेसाठी महापालिकेच्या वतीने चार झोन तयार करण्यात आले असून त्यातील अ, ब, क या झोनमध्ये प्रत्येकी ९ तर ड मध्ये ८ झोन आहेत़ तसेच प्रत्येक गल्लीबोळातील कचरा उचलण्यासाठी ९३ अॅपे, ३८ टॅक्टर आणि १२ टिप्पर आहेत़ घंटागाडीद्वारे एकत्रित करण्यात येणारा कचरा प्रत्येक झोनमधील रॅम्पवरुन वरवंटी कचराडेपो येथे टाकण्यात येतो़
गेल्या काही दिवसांपासून काही प्रभागातील गल्लीबोळातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्याच फिरत नसल्याचे दिसून येत आहे़ परिणामी, काही नागरिक विरळ वस्ती असलेल्या रस्त्याच्या बाजूस हा कचरा टाकत आहेत़ तिथे ढीग साचलेले पाहून परिसरातील नागरिक हा कचरा पेटवून देत आहेत़ एवढेच नव्हे तर शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच अन्य गल्लीबोळातील रस्त्यांच्या बाजूस कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसून येत आहेत़ कचऱ्याचे हे ढिगारे वाढत असल्याचे पाहून नजीकचे काही नागरिक ते ढिगारे पेटवून देत आहेत़ विशेष म्हणजे, पहाटेच्या वेळी हा कचरा पेटवून दिला जात आहे़ त्याचा धूर दिवसभर परिसरात निघत असतो़ त्यामुळे शहरातील प्रदुषणात वाढ होत आहे़
वास्तविक पाहता, कचरा जाळणे हे कायद्याचे उल्लंघन असून तो गुन्हाही ठरतो़ परंतु, कचरा जाळणारे हे नागरिक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की, त्यांना त्याची माहिती नाही, हे अनुत्तरीय आहे़ विशेष म्हणजे, महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे कचरा जाळण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे़