वाहन खरेदी सुसाट! छत्रपती संभाजीनगरात दररोज नवीन १६८ पेट्रोल, तर १६ ई-वाहने रस्त्यावर
By संतोष हिरेमठ | Published: May 10, 2023 04:14 PM2023-05-10T16:14:41+5:302023-05-10T16:15:06+5:30
वर्षभरातील नव्या वाहनांनी यंदा गाठला कोरोनापूर्वीचा आकडा
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दररोज तब्बल नवीन १६८ (फोर व्हीलर आणि टू व्हीलर) पेट्रोल वाहने रस्त्यावर येत आहेत. तर दररोज १६ (फोर व्हीलर आणि टू व्हीलर) नवीन ई-वाहने रस्त्यावर दाखल होत आहेत. नव्या वाहनांमध्ये सर्वाधिक संख्या ही दुचाकींचीच आहे. कोरोनानंतर नव्या वाहनांची खरेदी काही प्रमाणात घटली होती. मात्र, आता वर्षभरातील नव्या वाहनांनी कोरोनापूर्वीचा आकडा गाठला आहे.
कोरोनापूर्वी जिल्ह्यात महिन्याला ७ हजार ते ८ हजार आणि वर्षाला ८० हजार ते ९० हजारांच्या घरात नव्या वाहनांची भर पडत होती. कोरोनानंतर मात्र यात घट झाली. दोन वर्षांत ६५ हजारांच्या घरात नव्या वाहनांची वाढ झाली. १० हजार ते १५ हजारांनी नव्या वाहनांच्या संख्येत घट झाली होती. परंतु आता पुन्हा एकदा नव्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कोरोनानंतर आता ई-वाहनांच्या खरेदीकडेही नागरिकांचा ओढा वाढत आहे.
नव्या वाहनांत दुचाकी ‘नंबर वन’
नव्या वाहनांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे दुचाकींचे आहे. वर्षभरात तब्बल ५५ हजारांवर नव्या दुचाकी रस्त्यावर आल्या. त्याशिवाय गेल्या वर्षभरात ई-दुचाकी खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. वर्षभरात तब्बल ५ हजारांवर ई-दुचाकी रस्त्यावर आल्या. पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल चार चाकी खरेदीचे प्रमाण निम्मे आहे.
२०२२-२३ मध्ये कोणती वाहने किती वाढली?
- दुचाकी - ५५,१९३
- ई-दुचाकी - ५,४३१
- पेट्रोल कार - ५,४५६
- डिझेल कार - २,९४६
- ई-चार चाकी - २०२
- पेट्रोल/सीएनजी कार - १,६०६
- पेट्रोल / एलपीजी कार - ७
- पेट्रोल हायब्रिड - ५६२
जिल्ह्यातील एकूण ई-वाहने
दुचाकी - ८,२३३
चार चाकी - ४९६
प्रवासी रिक्षा - ३८
मालवाहू रिक्षा -२७८
जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या - १६ लाख ७० हजार ११०
अशी वाढली वाहने
आर्थिक वर्ष - नवीन वाहने
- २०१८-१९ : ९१,८७४
- २०१९-२० : ८२,८२६
- २०२०-२१ : ६०,२४२
- २०२१-२२ : ६५,०५१
- २०२२-२३ : ८२,५२९