मोबाईल लुटणाऱ्या आरोपीसह खरेदीदार पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:04 AM2021-01-21T04:04:56+5:302021-01-21T04:04:56+5:30
शेख फईम उर्फ वटा शेख आयुब (२५,रा. सादातनगर ), अशांत उर्फ सोनू किशोर वाघमारे, प्रकाश यव्हाण गजले (२०,राहुलनगर ...
शेख फईम उर्फ वटा शेख आयुब (२५,रा. सादातनगर ), अशांत उर्फ सोनू किशोर वाघमारे, प्रकाश यव्हाण गजले (२०,राहुलनगर ,कातपूर पैठण)अशी संशयित आरोपींची नावे आहेत. १३ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९.३० वाजता मंगेश मुकुंद खिल्लारे या तरुणाच्या हातातील मोबाईल संजयनगर कमानीजवळून आरोपीने हिसकावून नेला होता. मंगेशने मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना हा मोबाईल पैठण येथील प्रकाश गजले वापरत असल्याचे पोलिसांना समजले. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार योगेश धोंडे आणि कर्मचारी मुजीब अली, गजानन मांटे, भावसिंग चव्हाण, राहुल खरात, सुनील मोटे, नितीन देशमुख आणि दादासाहेब झारगड यांनी गजले याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने त्याचा मावसभाऊ रणजीत याने त्याला मोबाईल दिल्याचे सांगितले. रणजीतला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने शेख फईम यांच्याकडून मोबाईल खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार वटा उर्फ फईम आणि त्याचा साथीदार अशांत यास मोबाईल चोरी प्रकरणी ताब्यात घेतले. सर्व आरोपींना मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.