शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पटीच्या आमिषाने दाम्पत्याला एक कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 04:13 PM2024-10-05T16:13:13+5:302024-10-05T16:13:19+5:30
दामदुप्पट परताव्याचे आमिष : बंटी बबली जोडपे पसार
छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत एका बंटी बबलीने परिसरातीलच दाम्पत्याला एक कोटी रुपयाचा गंडा घालून पसार झाले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात श्रृती मयूर बाफना व मयूर राजकुमार बाफना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनील प्रभाकर वासे (५७, रा. वर्धमान रेसिडेन्सी, उल्कानगरी) हे बजाज कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या इमारतीच्या फ्लॅट क्रमांक १ मध्ये राहणाऱ्या बाफना दाम्पत्यासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बाफना मार्क्स कॅपिटल ॲडव्हायजर प्रा. लि. नावाने व्यवसाय करत होते. त्याद्वारे अनेकांना दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत होते. वासे यांनाही त्यांनी २०२१ मध्ये त्यांच्या माध्यमातून पैसे गुंतवणुकीसाठी गळ घातली. वासे यांनी विश्वास ठेवत जून २०२१ पासून ५ टप्प्यांत बाफनाकडे ६५ लाखांची गुंतवणूक केली.
सहा लाखांचा परतावा दिला पण...
बाफनाने वासे यांना जुलै २०२१ ते मे २०२३ दरम्यान १२ टप्प्यांमध्ये सहा लाख ७० हजारांचा परतावा दिला. मात्र, त्यानंतर परतावा दिलाच नाही. त्यांनी आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करू, असे आश्वासन दिले. मात्र, डिसेंबरमध्ये बाफना दाम्पत्य अचानक घराला कुलूप लावून पसार झाले. वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय, घराला तेव्हापासून कुलूप आहे. वासे यांची मूळ ६५ लाख व परताव्याची ४६ लाख ७० हजार असे १ कोटी ५ हजार रुपयांची फसवणूक केली.
फसवणुकीची रक्कम वाढणार
बाफनाच्या विरोधात पहिली तक्रार वासे यांनी केली. यात आणखी गुंतवणूकदार अडकण्याची शक्यता असून फसवणुकीची रक्कम वाढू शकते. संबंधितांनी बँकेच्या व्यवहाराच्या माहितीसह जवाहरनगर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक दिलीप चंदन यांनी केले आहे.