डिसेंबरअखेरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ‘ग्रामीण ॲप’ होईल हजेरीसाठी सज्ज; अशी असेल कार्यपद्धती
By विजय सरवदे | Published: November 10, 2023 06:02 PM2023-11-10T18:02:22+5:302023-11-10T18:02:51+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात केंद्रीय नियंत्रण कक्ष
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद मुख्यालय आणि चार पंचायत समित्यांमध्ये सध्या ‘ग्रामीण ॲप’च्या माध्यमातून यशस्वीरीत्या हजेरी सुरू आहे. उर्वरित पाच पंचायत समिती कार्यालयांमध्ये ‘जिओ फेन्सिंग’चे काम शेवटच्या टप्प्यावर आहे. तथापि, डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सर्व जि. प. कर्मचाऱ्यांची हजेरी या ॲपच्या माध्यमातून घेतली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांत सध्या ‘थंब इम्प्रेशन’च्या माध्यमातून हजेरी घेतली जाते. यामुळे कार्यालयात वेळेत येणाऱ्या आणि जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती त्या त्या विभागप्रमुखांनाच असते. सामान्य प्रशासन विभाग किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने यासंबंधीची माहिती मागितली, तेव्हाच मिळते. हजेरीची दैनंदिन माहिती मिळण्यासाठी ‘ग्रामीण ॲप’ लाँच करण्यात आले आहे. जि. प. मुख्यालयातील विभाग आणि चार पंचायत समित्यांमध्ये ते यशस्वी झाले असून, उर्वरित ठिकाणी त्याची चाचणी घेतली जात आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी या ॲपच्या ‘जिओ फेन्सिंग’चे काम शेवटच्या टप्प्यावर आहे. कर्मचाऱ्याने ‘क्यूआर कोड’चा फोटो काढून नेल्यास त्याला हजेरी लावता येणार नाही. ‘जिओ फेन्सिंग’मुळे लगेच लोकेशन कळते. त्यामुळे कार्यालयातच ‘क्यूआर कोड’ स्कॅन करावा लागणार आहे.
कार्यालयात उशिरा येणे किंवा लवकर जाणाऱ्या कर्मचाऱ्याची पहिल्यांदा विनावेतन रजा टाकली जाईल. त्यानंतर पुन्हा तोच प्रकार घडत राहिला, तर संबंधितावर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे, असे मीना यांनी सांगितले.
‘सीईओ’ कार्यालयात नियंत्रण कक्ष
या ॲपच्या माध्यमातून कोणता कर्मचारी उशिरा येतो, लवकर जातो, कोणी दांडी मारली, याचे निरीक्षण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार होत आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी मीनादेखील त्यांच्या कार्यालयातील मॉनिटरवर ते पाहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.
हजेरीची कार्यपद्धत कशी असेल?
जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ‘ग्रामीण ॲप’ मोबाइलवर डाउनलोड करून घेतले आहे. सर्व संबंधित कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘क्यूआर’ कोड लावण्यात आला आहे. हे ॲप ऑन केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मोबाइल आपल्या चेहऱ्यासमोर धरायचा. त्यात एका लाल वर्तुळात कर्मचाऱ्याचा फोटो दिसतो. ते वर्तुळ हिरव्या रंगाचे झाले की, त्याने लगेच ‘क्यूआर कोड’ स्कॅन करायचा. मगच हजेरी लागते.