CAA : मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोलीत मोर्चाला गालबोट; जमावाकडून वाहनांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 17:16 IST2019-12-20T17:14:24+5:302019-12-20T17:16:24+5:30
मोर्चाच्या समाप्तीनंतर बीड आणि परभणी येथे एका गटाने पोलिसांवर व वाहनांवर दगडफेक केली

CAA : मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोलीत मोर्चाला गालबोट; जमावाकडून वाहनांवर दगडफेक
औरंगाबाद : सुधारित नागरी बीलास देशभरात विरोध वाढत असून शुक्रवारीसुद्धा अनेक ठिकाणी मोर्चा काढून निषेध करण्यात आला. मराठवाड्यात शुक्रवार मोर्चा दिवस ठरला. सकाळी शांततेत निघालेल्या मोर्चास काही भागात गालबोट लागले असल्याची माहिती आहे. मोर्चाच्या समाप्तीनंतर बीड आणि परभणी येथे एका गटाने पोलिसांवर व वाहनांवर दगडफेक केली यामुळे इथे काही काळ तणावाची स्थिती होती.
मराठवाड्यात सुधारित नागरी बीलास विरोध वाढत असून आज सर्व जिल्ह्यात या विरोधात मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हिंगोलीत एका बसवर तर कळमनुरी येथे चार बसवर जमावाने दगडफेक केली. कळमनुरीत दगडफेकीनंतर एक बस पेटविण्याचा प्रकार घडला. दुपारी मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी,नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात शांततेत मोर्चा काढण्यात आला.
बीड आणि परभणीत मात्र मोर्चा झाल्यानंतर एका गटाने पोलीस आणि वाहनांवर दगडफेक केली. बीडमध्ये भाजी मंडई, बशीरगंज भागात जमावाने तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती आहे. तर परभणीत एक गटाने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले. तसेच अग्निशमन दलाच्या एका वाहनाची यावेळी तोडफोड करण्यात आली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी बळाचा वापर करत जमाव पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान,बीडमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बशीरगंज भागातील तणाव आता निवळला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी उपस्थित आहेत.