CAA Protest : ‘सीएए’ मागे घ्यावाच लागेल; औरंगाबादमध्ये पुन्हा उसळला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:54 AM2019-12-28T11:54:24+5:302019-12-28T12:13:50+5:30
मुस्लिम, दलित, बहुजन समाज रस्त्यावर; महिलांचीही लक्षणीय उपस्थिती
औरंगाबाद : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)च्या विरोधात शुक्रवारी औरंगाबाद अॅक्शन कमिटीतर्फे जामा मशीद ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडले. केंद्र शासनाने एनआरसी, सीएए कायदा परत घेतलाच पाहिजे असा हुंकार उपस्थित अथांग जनसागराने दिला. त्याला खा. मनोज झा, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर, आ. जितेंद्र आव्हाड, नवनिर्वाचित आ. झिशान बाबा सिद्दीकी यांनी आपल्या शब्दांत जोरदार समर्थन दिले. मोर्चात ४० पेक्षा अधिक पक्ष संघटनांनी सहभाग नोंदविला. औरंगाबादसह इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. औरंगाबाद शहरात मुस्लिमबहुल भागांत दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.
‘औरंगाबाद अॅक्शन कमिटी अगेन्स्ट सीएए, एनआरसी’ यांच्यातर्फे शुक्रवारी दुपारी २.३० वाजता जामा मशीद ते दिल्लीगेट येथील विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारच्या विशेष नमाजसाठी ऐतिहासिक जामा मशीद येथे भाविकांनी अलोट गर्दी केली होती. मशीद परिसरात पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. नमाज अदा केल्यानंतर दुपारी मोर्चाला सुरुवात झाली. ठिकठिकाणी मोर्चातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आमखास मैदान ते दिल्लीगेटकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. जिकडे-तिकडे अथांग जनसागरच दिसून येत होता. दिल्लीगेटच्या जवळ मंच उभारण्यात आले होते. लेबर कॉलनी, चेलीपुरा, रंगीनगेटपर्यंत हजारो नागरिकांपर्यंत व्यासपीठावरील मान्यवरांचा आवाज पोहोचावा अशी ध्वनिक्षेपक यंत्रणा उभारण्यात आली होती.
अॅक्शन कमिटीच्या हजारो स्वयंसेवकांनी पार्किंगची व्यवस्था तसेच रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. अनेक महत्त्वाच्या स्वयंसेवकांकडे वॉकीटॉकी देण्यात आली होती. दुपारी ३ वाजता मोर्चा दिल्लीगेट येथे दाखल झाला. त्यापूर्वीच हजारोंचा जनसमुदाय तेथे जमला होता. हाफेज मुस्तफा खान यांनी पवित्र धर्मग्रंथातील काही अध्यायाचे वाचन केले. त्यानंतर अॅक्शन कमिटीचे निमंत्रक जियाउद्दीन सिद्दीकी यांनी अत्यंत जोशपूर्ण पद्धतीने एनआरसी, सीएएच्या विरोधात भूमिका मांडली. त्यांना उपस्थित जनसमुदायानेही टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटासह प्रतिसादही दिला.
एनआरसी, सीएएचा प्रतीकात्मक ‘जनाजा’
एनआरसी, सीएए असे लिहिलेला एक प्रतीकात्मक जनाजा तयार करण्यात आला होता. मृतदेहाला प्रत्येक मुस्लिम बांधव ज्या पद्धतीने खांदा देतात तसेच या प्रतीकात्मक ‘जनाजा’ला जनसागरातर्फे खांदा देण्यात येत होता. या जनाजाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
महापुरुषांच्या वेशभूषेत मुले
अॅक्शन कमिटीच्या व्यासपीठावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौैलाना अबुल कलाम आझाद यांची वेशभूषा करून काही मुले-मुली आली होती. उपस्थितांचे त्यांनी लक्ष वेधून घेतले.
घोषणांचा अक्षरश: पाऊस
महामोर्चात प्रारंभीपासून अखेरपर्यंत घोषणांचा अक्षरश: पाऊसच पाडण्यात आला. लेकर रहेंगे...आझादी, इन्कलाब जिंदाबाद, जब तक सीएए तब तक रहेंगी जंग, अशा अनेक घोषणा यावेळी व्यासपीठावरून देण्यात आल्या. उपस्थित जनसागरानेही तेवढाच प्रतिसादही दिला.
आकर्षक फलकांनी वेधले लक्ष
मोर्चात सहभागी झालेल्या हजारो नागरिकांच्या हातात विविध फलक होते. समाज बचाने निकले हैै, आओ हमारे साथ चलो, आज हमारी बारी, कल तूम्हारी बारी, स्टॉप हेट पॉलिटिक्स, सीएए नही रोजगार चाहिये, कानुन के नाम पर दादागिरी नही चलेगी आदी फलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
आजपर्यंतचे विक्रम मोडीत काढले
मुस्लिम आरक्षणासाठी अवामी कमिटीपर्यंत यापूर्वी भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर एमआयएमच्या नेतृत्वाखाली २० डिसेंबर रोजी आझाद चौक ते दिल्लीगेटपर्यंत मोर्चा काढण्यात आला. आजच्या मोर्चाने मागील सर्व मोर्चाचे विक्रम मोडीत काढले. एवढा अथांग जनसागर आजपर्यंत औरंगाबाद शहराने कधी बघितला नव्हता.
महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती
मोर्चात सहभागी होण्यासाठी महिलाही मोठ्या संख्येने आल्या होत्या. दिल्लीगेट परिसरात सुभेदारी विश्रामगृहाच्या बाजूला महिलांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्यात आली होती.
खा. जलील नागरिकांसोबत
एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांना व्यासपीठावर येण्याची विनंती संयोजकांनी वारंवार केली. मात्र, ते व्यासपीठावर आले नाहीत. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे ते मोर्चात सहभागी झाले होते. एमआयएमचे सर्व नगरसेवकही मोर्चात सहभागी झाले होते.
गुलाबपुष्प देऊन पोलिसांचे स्वागत
दिल्लीगेट येथे औरंगाबाद अॅक्शन कमिटीतर्फे उपस्थित पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात येत होते. मोर्चात सहभागी महिला, लहान मुले पोलिसांसोबत सेल्फी काढताना दिसून आले.
दोन अॅम्ब्युलन्सला क्षणार्धात वाट मोकळी
दिल्लीगेट येथे दुपारी चार वाजता अचानक जनसागरात एक अॅम्ब्युलन्स सायरन वाजवीत आली. अॅम्ब्युलन्स दूरवर असतानाच उपस्थित हजारो नागरिकांनी क्षणार्धात वाट मोकळी करून दिली. कार्यक्रम संपल्यानंतर दिल्लीगेटहून घाटीकडे जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सलाही विनाअडथळा वाट मोकळी करून देण्यात आली.