मंत्रिमंडळाचे खातेवाटप १५ ऑगस्टपूर्वी, जे खाते मिळेल त्यात बेस्ट करू: अतुल सावे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 05:47 PM2022-08-12T17:47:10+5:302022-08-12T17:47:54+5:30
मुख्यमंत्री शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खाते देतील त्यात 'बेस्ट' काम करू
औरंगाबाद: शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस झाल्यानंतरही अद्याप खातेवाटप झाले नाही. दरम्यान, खातेवाटप १५ ऑगस्टपूर्वी करण्यात येईल अशी माहिती भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सावे यांचे औरंगाबाद येथे आज आगमन झाले. यावेळी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्य सरकारचा तब्बल ४० दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. शिंदे गट आणि भाजप यांच्या प्रत्येकी ९ अशा १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यालाही आता तीन दिवस झाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर १८ मंत्र्यांना १८ जिल्ह्याचे पालक केले आहे. खातेवाटप जाहीर नसल्याने अनेक कामांचा खोळंबा झाला असून पालकमंत्र्यांची नियुक्ती देखील रखडली आहे.
जसा मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला तसा खातेवाटपाला देखील वेळ लागत आहे. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका सुरु केली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर आता भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सावे यांचे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज शहरात आगमन झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी खाते वाटपावर भाष्य केले आहे. १५ ऑगस्ट पूर्वी मंत्रिमंडळाचे खाते वाटप होईल. मुख्यमंत्री शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे खाते देतील त्यात 'बेस्ट' काम करू, अशी ग्वाही देत सावे यांनी चांगले खाते मिळेल असेही अप्रत्यक्ष संकेत दिले. तसेच शहराच्या विकासात मंत्रिपदाने योगदान देऊ, महापालिकेवर शिंदे गटाला सोबत घेऊन भगवा फडकवू असेही सावे म्हणाले.