कॅबिनेटमंत्री भुजबळ नेमके कोणत्या सरकारवर टीका करीत आहेत ? संभाजी ब्रिगेडचा सवाल

By बापू सोळुंके | Published: November 18, 2023 12:24 PM2023-11-18T12:24:33+5:302023-11-18T12:25:38+5:30

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांचा सवाल

Cabinet Minister Chhagan Bhujbal is criticizing which government exactly? Question of Sambhaji Brigade | कॅबिनेटमंत्री भुजबळ नेमके कोणत्या सरकारवर टीका करीत आहेत ? संभाजी ब्रिगेडचा सवाल

कॅबिनेटमंत्री भुजबळ नेमके कोणत्या सरकारवर टीका करीत आहेत ? संभाजी ब्रिगेडचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी समाजाच्या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. कदाचित ते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असल्याने सरकारचा भाग आहे, हे ते विसरलेले दिसतात, असा टोला संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ता डॉ.शिवानंद भानुसे यांनी लगावला.

डॉ. भानुसे म्हणाले की, भुजबळ यांना राज्य सरकारचे निर्णय त्यांना पटत नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे किंवा सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या भुजबळांची मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमधून हकालपट्टी करावी, हीच खरी लोकशाही असल्याचे त्यांना दाखवून द्यावे, असे आपले त्यांना आव्हान आहे. भुजबळ यांनी अंबड येथील सभेमध्ये राज्य सरकारने नेमलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगावर, मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या तीन न्यायमूर्तीच्या समितीमधील न्यायमूर्ती संंदीप शिंदे समितीवर, न्यायमूर्ती गायकवाड आयोगावर आणि राज्य सरकारच्या कामकाजावर कडाडून टीका केली. सरकारचा एक भाग असलेला मंत्रीच राज्य सरकारवर टीका करतो. हे मोठे आश्चर्य आहे. जर त्यांना राज्य सरकारच्या भूमिका, सरकारचे ध्येय, धोरण, सरकारचे कामकाज आवडत नाही. तर ते राज्यसरकार मधून बाहेर का पडत नाहीत ? आणि ते स्वतः सरकारचा घटक असल्यामुळे ते नेमक्या कोणत्या राज्य सरकारवर टीका करतात ? असा सवाल भानुसे यांनी केला. आपल्याच सरकारवर टीका करणाऱ्या भुजबळांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे बडतर्फ का करत नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सर्व मिळून महाराष्ट्रातील जनतेला वेड्यात काढत असल्याचे ते म्हणाले.

जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करू नका
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की, तुम्ही जर भुजबळांना पाडणार असाल तर आम्ही ११७ मराठ्यांचे आमदार पाडू. त्यावर आमचं म्हणणं आहे की, जर येत्या अधिवेशनात जे आमदार मराठा आरक्षणावर बोलले नाही तर आम्हीच भुजबळांसह सर्वानाच पाडू. हा शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. येथे जाणीवपूर्वक जाती-जातीत तेढ निर्माण करू नका, असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला.

Web Title: Cabinet Minister Chhagan Bhujbal is criticizing which government exactly? Question of Sambhaji Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.