बीड बायपासवर केबलचे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:03 AM2017-10-10T00:03:39+5:302017-10-10T00:03:39+5:30
सातारा-देवळाई वसाहतीत बीड बायपासवरील पथदिव्यांवर विविध केबलचे जाळे अंथरले असून, केबल टाकण्याची परवानगी नसल्याचे सांगितले जात असले तरी विद्युत विभाग व मालमत्ता विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सातारा-देवळाई वसाहतीत बीड बायपासवरील पथदिव्यांवर विविध केबलचे जाळे अंथरले असून, केबल टाकण्याची परवानगी नसल्याचे सांगितले जात असले तरी विद्युत विभाग व मालमत्ता विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलीत आहेत. सोसाट्याच्या वा-याने वायर तुटून वाहनचालकाच्या अपघातास ते कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सातारा-देवळाई परिसर झपाट्याने वाढला असून, महानुभाव आश्रम चौक ते देवळाई चौक दुतर्फा विविध वसाहती, दवाखाने, महाविद्यालये, व्यावसायिक दुकाने आहेत. रस्त्यावर जड वाहनांपासून ते दुचाकी व पादचा-यांची नेहमीच वर्दळ असते. अतिताण व सोसाट्याच्या वा-यात किंवा वाहनाचा धक्का खांबाला लागून वायर रस्त्यावर अडसर ठरते.
लोडशेडिंग सुरू झाल्याने रस्त्यावर लटकलेले वायर दुचाकीस्वारासाठी धोका ठरू शकते. अंधारात दुचाकीस्वाराला धोकादायक वायर दिसले नाही तर गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे.
पथदिव्यावर एक नव्हे, दोन नव्हे, तर डझनभर वायरींचे जाळे पसरले आहे. या वायर टाकण्यासाठी परवानगी घेतली किंवा नाही याविषयी मनपाच्या विद्युत विभागाने चेंडू मालमत्ता विभागाकडे टोलविला, तर त्यांनी तो परत विद्युत विभागाकडे टोलविला.
खांबावर टाकलेल्या वायरमध्ये विद्युत प्रवाह नसल्याने त्या धोकादायक नसल्याचेही अनेकांनी मोघम मत मांडले; परंतु परवानगी घेतली नसेल तर महसूल बुडत असल्याचेही सांगितले. त्याचा सर्वे करून त्यावर कारवाई करण्यात येऊ शकते; परंतु ही जबाबदारी दुस-या विभागाकडे असल्याचेही पुन्हा टोलविले.
मनपाच्या अधिका-यांनी दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रा.अरविंद अवसरमोल, संदीप कुलकर्णी, कुलदीप शिंदे, जे. के. पाटील, रूपाली गायकवाड, बाळासाहेब मोरे आदींनी केली आहे.