सकाळी बोलावलेले कर्मचारी रात्री रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:10 AM2017-11-24T00:10:35+5:302017-11-24T00:10:43+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२४) मतदान होत आहे. यासाठी १८ मतदान केंद्रांवर कर्मचा-यांना प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रांतील साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी ८ वाजता बोलावण्यात आले. मात्र, नियोजनाअभावी मतदान केंद्राकडे शेवटचा कर्मचारी रात्री ८ वाजता विद्यापीठातून बाहेर पडल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२४) मतदान होत आहे. यासाठी १८ मतदान केंद्रांवर कर्मचा-यांना प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रांतील साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी ८ वाजता बोलावण्यात आले. मात्र, नियोजनाअभावी मतदान केंद्राकडे शेवटचा कर्मचारी रात्री ८ वाजता विद्यापीठातून बाहेर पडल्याचे सूत्रांनी सांगितले.
विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील गोंधळाची परंपरा मतदानाच्या दिवसापर्यंत कायम राहिली. प्रत्येक ठिकाणी नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले. मतदानासाठी चार जिल्ह्यांत ठरविलेल्या १८ मतदान केंद्रांवर केंद्रप्रमुख, मतदान अधिकाºयांसह इतर कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात येणार होते. हे प्रशिक्षण सकाळच्या सत्रात दिल्यानंतर १२ वाजेच्या आत उस्मानाबाद जिल्ह्यातील मतदान केंद्रांकडे अधिकारी रवाना होण्याची नियोजन केले होते. मात्र, प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर कोण कोठे जाणार याचेच नियोजन केलेले नव्हते. जेव्हा कोणी कुठे जायचे, असा प्रश्न उपस्थित झाला तेथून पुढे नियोजनाची तयारी सुरू केली. याशिवाय कर्मचाºयांना मतदान केंद्रावर कर्मचाºयांनी काय घेऊन जायचे याच्याही सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या. यामुळे दुपारपर्यंत हाच गोंधळ राहिला. दुपारनंतर कर्मचाºयांना मतदानासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर सायंकाळच्या वेळी कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना होण्यास सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर पाठविला जाणारा शेवटचा कर्मचारी रात्री ८ वाजता विद्यापीठातून बाहेर पडल्याचे समजते. शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधींचे अर्ज, ओळखपत्र केव्हा तयार करून देणार, सीसीटीव्ही यंत्रणा केव्हा बसवणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मतपत्रिका कमी पडल्या
विद्यापीठाने पुरेशा प्रमाणात मतपत्रिका छापल्याच नसल्याचे दुपारी समोर आले. यानंतर मतपत्रिका छापण्याच्या आॅर्डर देण्यात आल्या. या मतपत्रिका सायंकाळपर्यंत विद्यापीठ प्रशासनाला मिळाल्याचे समजते. यावरून मतदानाविषयीचा निष्काळजीपणा स्पष्ट होते.