यालाच तर म्हणतात राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:05 AM2021-02-09T04:05:41+5:302021-02-09T04:05:41+5:30
रऊफ शेख फुलंब्री : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते असे नेहमी बोलले जाते. त्यास आता राजकारणाची पण जोड ...
रऊफ शेख
फुलंब्री : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते असे नेहमी बोलले जाते. त्यास आता राजकारणाची पण जोड मिळाली आहे. कारण शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल याचा नेम नसतो. तसाच काहीसा प्रकार फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीदरम्यान पुढे आला आहे. शेवटच्या दिवशीच्या उलटफेरमध्ये पॅनलला सोडून दुसऱ्या पॅनलमध्ये जाऊन पाकिजा पठाण या सरपंच बनल्या. या अनपेक्षित बदलामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
जिल्ह्यातील वडोदबाजार ही ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने ती ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते उत्सुक असतात. यंदाही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. १५ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेस -शिवसेना मित्र पक्षाच्या पॅनलचे ८ तर भाजपच्या ग्रामविकास कष्टकरी गटाचे ७ सदस्य निवडून आले होते. सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिलांचे आरक्षण निघाल्यानंतर सर्वच सदस्य सहलीवर गेले होते. भाजप प्रणीत पॅनलचे ७ सदस्य असल्याने त्यांना बहुमतासाठी एका सदस्याची गरज होती. त्यांनी हेच हेरून विरोधी गटातील पाकिजा पठाण यांना गळ घालत थेट सरपंचपदाची ऑफर देत आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले. या निर्णयामुळे बहुमत असून सुद्धा शेवटच्या क्षणी कॉंग्रेस -शिवसेना मित्र पक्षाच्या पॅनलला सत्तेपासून वंचित राहावे लागले.
----- रुग्णवाहिकेतून गावात प्रवेश ------
कॉंग्रेस - शिवसेना मित्र पक्षाच्या पॅनलचे आठ सदस्य निवडून आल्यानंतर सरपंच व उपसरपंचपदाचे दावेदार असलेल्या सदस्यासह सर्वांनाच सहलीवर नेले होते. यातील एकाही सदस्याने दगा दिला तर ग्रामपंचायतीच्या चाव्या हातातून जाणार असल्याची कल्पना सर्वांनाच होती. त्यामुळे सदस्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. परंतु, रविवारी पाकिजा पठाण यांच्या मुलाची तब्येत ठिक नसल्याने त्या माघारी परतल्या होत्या. आणि सोमवारी सरपंच निवडीदरम्यान त्या चक्क दुपारी रुग्णवाहिकेतून गावात आल्या; मात्र त्यांनी विरोधी पॅनलच्या माध्यमातून सरपंचपदासाठी अर्ज करत निवडीत बाजी मारली.