वाद मिटविण्यासाठी बोलावले अन् भोसकून संपविले; विवाह १५ दिवसांवर असताना तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 12:30 PM2024-12-03T12:30:36+5:302024-12-03T12:32:49+5:30
हर्सूल कारागृहाच्या समोरील मैदानातील घटना : पाचजणांचे कृत्य, आरोपी फरार
छत्रपती संभाजीनगर : जुना वाद मिटविण्यासाठी एकास हर्सूल कारागृहासमोरील मैदानावर सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले. त्याच्यासोबत इतर मित्र नसल्याचा फायदा घेत चाकूने भोसकत क्रिकेट खेळण्याच्या बॅटने मारहाण करीत खून केला. हा वाद सोडविण्यास आलेल्या मृताच्या मित्रासही चाकूने मारहाण केली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश ऊर्फ बबलू परमानंद मोरे (वय ३२, रा. चेतनानगर, हर्सूल परिसर) असे मृताचे नाव आहे. आरोपींमध्ये गणेश सोनवणे, अनिकेत ऊर्फ विक्की गायकवाड याच्यासह इतर पाचजणांचा समावेश आहे. सुमीत चव्हाण असे जखमीचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार दिनेशचे आरोपी गणेश सोनवणे याच्यासोबत सहा महिन्यांपासून वाद सुरू होते. सोमवारी दुपारी आरोपींनी दिनेशला हर्सूल कारागृहाच्या समोरील रिकाम्या मैदानात वाद मिटवायचे असल्याचे सांगून बोलावून घेतले. दिनेश एका सहकाऱ्यासोबत मैदानावर गेला. तेथे आरोपीतील एकाने त्यास चाकूने भोसकले. इतर आरोपींनी क्रिकेटची बॅट, रॉड आणि लाकडाने मारहाण केली. त्यात दिनेश गंभीर जखमी झाला. त्याला सोडविण्यासाठी सुमीत चव्हाण आला असता, त्याच्या पाठीवरही चाकूने वार करण्यात आले. तोही गंभीर जखमी झाला. हा प्रकार पाहून बघ्यांची गर्दी जमली. तेव्हा आरोपींनी कारमधून धूम ठोकली. त्यानंतर नागरिकांनी दिनेश व सुमीत यांना घाटी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी दिनेश ऊर्फ बबलू यास मृत घोषित केले. सुमीतवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सहायक आयुक्त धनंजय पाटील, सपोनि शेषराव खटाणे यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली.
घटनास्थळी बघ्यांची, तर घाटीत समर्थकांची गर्दी
हर्सूल कारागृहाच्या समोरील मैदानात हा प्रकार घडल्यानंतर बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याच वेळी दिनेशचा मृतदेह घाटी रुग्णालयात असल्यामुळे त्याच्या मित्रपरिवाराने घाटीत माेठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी आरोपीच्या शोधात पथके तैनात केली आहेत.
मृताचा १५ डिसेंबरला होता विवाह
रिक्षाचालक असलेल्या दिनेशचे सहा महिन्यांपूर्वी लग्न जमले होते. त्याचा साखरपुडाही झाला होता. त्याचे लग्न १५ डिसेंबरला होणार होते, अशी माहिती मित्रांनी दिली. या घटनेमुळे दिनेशच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.