कॅरीबॅगविरोधात पालिकेची मोहीम थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:19 AM2017-10-30T00:19:06+5:302017-10-30T00:19:13+5:30
शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने पालिकेने काही महिन्यांपूर्वी सुरू केलेली प्लास्टिक कॅरीबॅग बंदीची मोहीम थंडावली आहे. त्यामुळे शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा सर्रास वापर वाढला आहे. त्यामुळे पुन्हा शहराचे सौंदर्य लयास जाण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने पालिकेने काही महिन्यांपूर्वी सुरू केलेली प्लास्टिक कॅरीबॅग बंदीची मोहीम थंडावली आहे. त्यामुळे शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा सर्रास वापर वाढला आहे. त्यामुळे पुन्हा शहराचे सौंदर्य लयास जाण्याची वेळ आली आहे. मोहीम राबविणार असल्याचे मात्र तेवढे पालिकेकडून नित्यनियमाने बोलल्या जात आहे.
पालिकेने काही महिन्यांपूर्वी प्लास्टिक कॅरीबॅग मोहीम राबवून अनेकांवर दंडात्मक कारवाई केली होती. या कालावधीत कॅरीबॅग विक्रेत्यांनी चांगलाच धसका घेऊन कॅरीबॅगचा वापरच करणे बंद केले होते. मात्र पालिका थंडावताच आता कॅरीबॅग विक्रीला व वापराला गती आल्याचे भयंकर चित्र बाजारात पहावयास मिळते. तसेच येथेच प्लास्टिकचे सेंटरही असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे बाजारातील लघु व्यवसायिकांसह फुटकळ व्यवसायिकांना सहज कॅरीबॅग उपलब्ध होतात. तसेच पालिका नरमल्याने की काय? कॅरीबॅग कधीच बंद होत नसल्याचेही व्यवसायिकांतून बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे फळ विक्रेत्यांसह भाजीमंडई आणि भव्य कापड दुकानातही कॅरीबॅगचा सर्रास वापर सुरु आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी स्वच्छ व सुंदर झालेल्या शहरात पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. आजही शहरातील बºयाच्या नाल्यात व कचराकुंडीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅरीबॅग आढळून येत आहेत. त्यामुळे पालिका कॅरीबॅग बंदीसाठी पाऊल उचलणार तरी कधी? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कालावधी संपून महिना उलटला आहे. मात्र कारवाईसाठी सध्यातरी पालिका सरसावलेली नाही.