औरंगाबाद जिल्ह्यात महावितरणची कृषिपंपांविरुद्ध धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 05:46 PM2018-09-26T17:46:46+5:302018-09-26T17:47:41+5:30
महावितरणने आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्या कृषिपंपांची वीज तोडणे, जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी थकबाकीदार कृषिपंपचालक शेतकऱ्यांकडून किमान वीज बिल वसूल करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. हातातोंडाला आलेली पिके माना टाकू लागली आहेत. त्यामुळे मिळेल तेवढे पाणी पिकांना देण्याची सध्या चढाओढ सुरू आहे. परिणामी, रोहित्र जळण्याची संख्या वाढली असून, दुरुस्तीची मागणीही वाढली आहे. त्यामुळे महावितरणने आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्या कृषिपंपांची वीज तोडणे, जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी थकबाकीदार कृषिपंपचालक शेतकऱ्यांकडून किमान वीज बिल वसूल करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे.
यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, १९ सप्टेंबर रोजी महावितरणच्या संचालकांनी (संचलन) राज्यातील सर्व परिमंडळांना कृषिपंपांचे अनधिकृत वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून या मोहिमेने वेग घेतला आहे. सध्या शेतीला पाणी देण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा तब्बल २० ते २५ टक्के जास्तीची विजेची मागणी वाढली असून रोहित्र जळण्याची संख्याही वाढली आहे. एकेका शेतामध्ये दोन-दोन विद्युत मोटारी सुरू असल्याचेही गणेशकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे.
रोहित्र दुरुस्तीसाठी परिसरातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी ज्यांचे २५ हजार रुपयांपर्यंत वीज बिल थकले असेल, त्यांनी किमान ३ हजार रुपयांची थकबाकी भरावी, तर ज्यांचे २५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल थकले आहे, त्या शेतकऱ्यांनी किमान ५ हजार रुपये थकबाकी भरल्यास रोहित्र दुरुस्त करून देण्याची अट महावितरणने घातली आहे. दिवसेंदिवस कृषिपंपांच्या थकबाकीमध्ये मोठी वाढ होत चालली आहे. कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे.
कृषिपंपांकडे १ हजार ७०२ कोटी १६ लाख रुपये थकबाकी
जिल्ह्यात एकूण २ लाख १६ हजार ५९३ कृषिपंप ग्राहकांकडे १ हजार ७०२ कोटी १६ लाख रुपये एवढी थकबाकी असून, यापैकी २५ हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेले १ लाख ८५ हजार ४४५ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे १ हजार ६६० कोटी ५९ लाख रुपये थकबाकी आहे, तर २५ हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेले ३१ हजार १४८ ग्राहक असून त्यांच्याकडे ४१ कोटी ५७ लाख रुपये थकबाकी आहे.