डेंग्यू रोखण्यासाठी मोहीम
By Admin | Published: September 7, 2014 12:38 AM2014-09-07T00:38:37+5:302014-09-07T00:42:35+5:30
औरंगाबाद : शहरात डेंग्यूचे थैमान सुरूच असल्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने पुन्हा एकदा धूरफवारणी आणि अॅबेट ट्रीटमेंटची मोहीम गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद : शहरात डेंग्यूचे थैमान सुरूच असल्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने पुन्हा एकदा धूरफवारणी आणि अॅबेट ट्रीटमेंटची मोहीम गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या काळात शहरात विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
औरंगाबाद शहरात दीड महिन्यापासून डेंग्यूने डोके वर काढले आहे. डेंग्यूच्या अळींचा सर्वत्र प्रादुर्भाव झाल्यामुळे शहरातील सर्वच भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत.
मागील दीड महिन्यात शहरात डेंग्यूने १० जणांचे बळी घेतले आहेत. सुरुवातीस तीन- चार जणांचे बळी गेल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे होऊन डासांना प्रतिबंध करण्यासाठी शहरात धूरफवारणी सुरू केली होती. याशिवाय घरोघरी जाऊन पाण्यात अॅबेट टाकणे, पाणीसाठ्यात अळ्या झाल्या आहेत का हे तपासणे आदी कामेही मनपाने राबविली; परंतु त्यानंतर ही मोहीम मंदावली होती. पुन्हा मनपाच्या आरोग्य विभागाने शहरात डासांच्या निर्मूलनासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ९ सप्टेंबरपासून १३ सप्टेंबरपर्यंत शहरातील सर्व भागांत ही मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत प्रत्येक भागात धूरफवारणी केली जाणार आहे. तसेच अॅबेट ट्रीटमेंट केली जाणार आहे.