आमच्याकडील मंगळागौरीसाठी नवीन लग्न झालेल्या तरुणी मिळतील का?
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 15, 2023 03:30 PM2023-07-15T15:30:30+5:302023-07-15T15:32:02+5:30
नवविवाहिता शोधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर
छत्रपती संभाजीनगर : आमच्याकडे पहिली मंगळागौर आहे, पूजेसाठी नवीन लग्न झालेल्या तरुणी मिळतील का, अशा मेसेजद्वारे सोशल मीडियावरील विविध ग्रुपमधून विचारणा केली जात आहे.
नवविवाहितांसाठी मंगळागौरीची पूजा अत्यंत महत्त्वाची मानले जाते. यानिमित्ताने सासरी व माहेरी एक आनंदाचे, मंगलमय वातावरण निर्माण होते. या पूजेसाठी ५ किंवा ७ नवविवाहिता लागत असतात. मात्र संपर्क कमी असल्यास या नवविवाहिता मिळत नाही. यामुळेच महिना, दीड महिना आधीपासूनच शोध सुरू होतो. पहिली मंगळागौर २२ ऑगस्टला आहे. यासाठी नवविवाहितांचा शोध सुरू झाला आहे. सोशल मीडियावर तसे मेसेज फिरू लागले आहेत.
का करतात मंगळागौरीचे पूजन ?
पती-पत्नी मधील प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून ‘शिवपार्वती’ या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशीर्वाद व कृपादृष्टी असावी या हेतूने मंगळागौरीची पूजा केली जाते. लग्नानंतर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात.
मंगळागौरीला आले इव्हेंटचे स्वरुप
काळ बदलत आहे तसे सण साजरे करण्याच्या पद्धती बदलत आहेत. पूजा, व्रत व बाकीचे विधी तेच आहे, पण त्यास इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यात इव्हेंट एजन्सीचा शिरकावा झाला आहे. यामुळे मंगळागौरीची पूजा सोहळ्याला भव्य-दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.
जनसंपर्क नसल्याने पूजेला नवविवाहिता मिळणे अवघड
अनेक कुटुंबे अशी आहेत की, त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांना मंगळागौरी पूजेसाठी ५ तर काहींना ७ नवविवाहिता मिळतात. पण काही ठिकाणी नवविवाहिता मिळत नाही. २ किंवा ३ जेवढ्या नवविवाहिता मिळतील, त्यांना सोबत घेऊन मंगळागौरीची पूजा केली जाते. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे पाच जणी मिळण्याची अडचण येत असावी.
- प्रवीण कुलकर्णी, गुरुजी
कुमारिकांनाही करता येते मंगळागौरपूजा
आमच्या ग्रुपमधील महिलांना ओळखीच्याकडून फोन येत असतात. मंगळागौरी पूजेसाठी तुमच्या ओळखीतील नवविवाहिता आहे का. दोन ते तीन महिने आधीच या नवविवाहितांच्या पूजेला जाण्याचा तारखा बुक होऊन जातात. ज्यांना पूजेसाठी नवविवाहिता मिळत नाही. त्यांना पर्याय म्हणून कुमारिका किंवा ज्या महिलांचे लग्न होऊन पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यांनाही पूजेत सहभागी करून घेता येते.
- अनुराधा पुराणिक, अध्यक्षा, ओंजळ ग्रुप
मंगळागौरीच्या तारखा कोणत्या?
२२ ऑगस्ट
२९ ऑगस्ट
५ सप्टेंबर
१२ सप्टेंबर