कुत्रा चावलाय, रेबीजचं इंजेक्शन घेतलं तर रक्तदान करता येते का?

By संतोष हिरेमठ | Published: July 30, 2024 08:24 PM2024-07-30T20:24:27+5:302024-07-30T20:24:36+5:30

रक्तदानाने गरजू रुग्णांना जीवदान : शारीरिक अन् मानसिक आरोग्य फिट असेल तर रक्तदान

Can you donate blood if you are bitten by a dog and have received a rabies injection? | कुत्रा चावलाय, रेबीजचं इंजेक्शन घेतलं तर रक्तदान करता येते का?

कुत्रा चावलाय, रेबीजचं इंजेक्शन घेतलं तर रक्तदान करता येते का?

छत्रपती संभाजीनगर : रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटले जाते. एखाद्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान जीवनदान ठरते. त्यामुळे अनेकजण नियमितपणे रक्तदान करतात. मात्र, अनेक कारणांनी इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही. कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लस घ्यावी लागते. ही लस घेतल्यानंतर वर्षभर रक्तदान करता येत नाही.

रक्तदान करताना आरोग्य उत्तम असणे गरजेचे असते. त्यामुळे रक्तदान करण्यापूर्वी दात्यांची आवश्यक ती तपासणी केली जात आहे. दात्याविषयी आवश्यक ती माहिती घेतल्यानंतरच रक्त केंद्रातील अधिकारी-कर्मचारी दात्याचे रक्तदान करून घेतात.

रक्तदान करताना उत्तम आरोग्य महत्त्वाचे
रक्तदान करताना दात्याचे आरोग्य उत्तम हवे. शारीरिक आरोग्याबरोबर दात्याचे मानसिक आरोग्यही चांगले हवे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

१८ ते ६५ वर्षे स्वेच्छेने करू शकाल रक्तदान
वयाची १८ वर्षे ते ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करता येते. मात्र, वयाच्या ६० व्या वर्षी पहिल्यांदा रक्तदान करता येत नाही. नियमितपणे रक्तदान करणाऱ्यास ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करता येते.

एचबी किमान १२.५; वजन हवे ४५ किलोंच्या पुढे
रक्तदानासाठी एचबी किमान १२.५ हवे, तर वजन किमान ४५ किलो हवे. ४५ किलो वजनाच्या व्यक्तीला ३५० मिली आणि ५५ किलो वजनाच्या व्यक्तीला ४५० मिली रक्तदान करता येते.

गर्भवतींना रक्तदान करता येते का ?
गर्भवतींना रक्तदान करता येत नाही. प्रसूतीनंतरही वर्षभर रक्तदान करता येत नाही. त्याबरोबरच बाळाला स्तनपान सुरू असेल, तरीही रक्तदान करता येत नाही. गर्भपातानंतर किमान सहा महिने रक्तदान करता येत नाही.

दर तीन महिन्यांनी करता येईल रक्तदान
पुरुषांना ९० दिवसांनी म्हणजे दर तीन महिन्यांनी रक्तदान करता येते, तर महिलांना दर १२० दिवसांनंतर म्हणजे चार महिन्यांनंतर रक्तदान करता येते.

रक्तदान करण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
- तीन दिवस अगोदर प्रतिजैविके घेतलेली नकोत
- गत तीन महिन्यांत मलेरिया झालेला नको
- वर्षभरात कावीळ, विषमज्वर झालेला नको
- रिक्रिएशनल, अंमली पदार्थांचे सेवन नको
- गत वर्षभरात श्वानदंश झालेला नको
- गत वर्षभरात रेबीजची लस घेतलेली नको
- रक्तदान करण्याआधी १५ दिवस आधी, कॉलरा, टायफाइड, प्लेगची लस घेतलेली असायला नको

या व्यक्तींना करता नाही येत रक्तदान
बंदीवान, हृदयाचे आजार, कॅन्सर रुग्ण, ट्रान्सजेंडर, इन्सलिन घेत असेल तर, थाॅयराॅइड रुग्ण ( यू थाॅराईड वगळून), हिपॅटिटीस बी, हिपॅटिसीस सी रुग्ण यांना रक्तदान करता येत नाही.

गरजू रुग्णांसाठी रक्तदान करा
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असणारी व्यक्ती रक्तदान करू शकते. गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी जास्तीत जास्त दात्यांनी घाटीतील विभागीय रक्त केंद्रात रक्तदान करावे.
- डाॅ. भारत सोनवणे, उपअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

Web Title: Can you donate blood if you are bitten by a dog and have received a rabies injection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.