नागरिकत्व कायद्यातील संशोधन रद्द करा; जमीयत उलामा-ए-हिंदतर्फे मूक मोर्चासह धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:52 PM2019-12-13T18:52:02+5:302019-12-13T18:54:34+5:30
दुपारी ३ वाजता जामा मस्जिद येथे नमाज पठन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली.
सिल्लोड़ : नागरिकत्व विधेयकातील संशोधनामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होत असल्याने हे संशोधन त्वरित रद्द करण्यात यावे अशी मागणी करत जमीयत उलामा-ए-हिंद तर्फे शुक्रवारी दुपारी शहरात मूक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व जमीयत उलामा-ए-हिंदचे तालुकाध्यक्ष हाफिज नजीर व सचिव देशमुख गुलाम हुसैन यांनी केले.
दुपारी ३ वाजता जामा मस्जिद येथे नमाज पठन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुस्लिम बाधव दंडावर काळ्या फिती लाऊन मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा अल्लामा इकबाल चौक,कॉ. करिमोद्दीन नाना चौक,प्रियदर्शनी चौक,महावीर चौक मार्गे उपविभागीय कार्यालयासमोर पोहचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर धरने आंदोलनात झाले. यावेळी नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक त्वरित रद्द करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांना देण्यात आले.
इस्लाम हा शांतिप्रिय धर्म असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात इस्लाम धर्मियांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे. आज देशात मुस्लीम समाजाला टार्गेट करण्याचे कार्य सुरु आहे. देशामध्ये बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, बलात्कार या सारख्या विविध समस्या आहे मात्र केंद्र सरकार केवळ धर्माच्या नावाखाली मुस्लिम धर्मियांना त्रास देण्याचे काम करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलनात आ. अब्दुल सत्तार,देशमुख गुलाम हुसैन,मौलाना आरेफ,हाफिज अब्दुल कादर, हाफिज शेख सादेख,हाफिज नजीर,हाजी शेख पाशु,हाजी शेख इसाक बागवान,प्रा शेख साजेद, अँड इरफ़ान पठाण,डॉ शकील,पठान अनवर मौलाना,शेख नदीम मौलाना,शेख कय्यूम,हाफिज बशीर मिर्जा,शेख आबेद,शेख फरमान कुरैशी,मौलाना अख्तर कुरैशी,मोहम्मद अली कुरैशी,इस्माइल कुरैशी,मौलाना जुबेर,मौलाना इरफान,हाफिज खलील,कैसर आझाद,शेख फेरोज,कॉ सय्यद अनीस,अँड नसीम अहेमद,मौलाना जाहेद, शेख अमान,शेख शाकेर आदींचा सहभाग होता.