‘मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, गुंठेवारी कायद्याविरोधात सातारा देवळाईतील नागरिकांचे उपोषण
By साहेबराव हिवराळे | Published: June 23, 2024 06:12 PM2024-06-23T18:12:30+5:302024-06-23T18:12:39+5:30
दिवसभर टाळ वाजवून उपोषणकर्ते यांनी केले भजन
छत्रपती संभाजीनगर : ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ...मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, ‘साताऱ्याचा खंडोबा.... शासनाला बुद्दी द्या...’,‘मनपाच्या आयुक्ता.. गुंठेवारी रद्द करा....’ अशा एक ना अनेक घोषणा देत गुंठेवारी कायद्याच्या विरोधात रविवारी (दि.२३) सातारादेवळाई परिसरातील नागरिकांनी नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली उपोषण करत भजनं गायले.
सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांनी आंदोलन दरम्यान सांगितले की, आम्ही स्वतः हक्काची जमीन खरेदी करीत सर्व नियमांचे पालन केले, त्यानंतरच घरे बांधली. आता गुंठेवारी सारखा रजाकरी कायदाआमच्यावर लागू केला हा कायदा रद्द करा यासाठी आम्ही दिवसभर टाळ वाजवून, भजन गात, घोषणा देत, उपोषणही केले. या कठोर गुंठेवारी कायद्याला रद्द करून आम्हाला निवांत जगू द्या अशी आमची ही मागणी शासनापर्यंत, मनपापर्यंत पोहचावी यासाठी हे अनोखे आंदोलन केले आहे.
दिवसभर आंदोलनस्थळी यांनी दिल्या भेटी....
यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले,सुदाम सोनवणे,विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे,बाळू गायकवाड,रमेश गायकवाड, हरिभाऊ हिवाळे,राजू शिंदे,खाजाभाई यांच्यासह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी येऊन गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय प्रयत्न करता येईल आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. पालकमंत्री यांनी दोन जुलैला मुख्यमंत्र्यांसोबत याविषयी बैठक लावण्याचे मार्गदर्शनात सांगितले.
दिवसभर टाळ,घोषणाबाजी नंतर इशारा
नागरिकांनी यावेळी ‘आश्वासन नको तर प्रत्यक्ष कृती हवी’, अशी अपेक्षा व्यक्त करत विधानसभा निवडणुकीत रोष व्यक्त केला जाईल असा इशाराही देण्यात आला. याशिवाय मनपाच्या अधिकारीवर्गानेही याकडे लक्ष द्यावे आवाहन करण्यात आले.
यांनी घेतला सहभाग
रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५वाजेपर्यंत सातारा देवळाई भागातील नागरिक लाक्षणिक उपोषण बीड बायपास रोड जबिंदा मैदान जवळ पुलाखाली बसलेले होते. लवकर निर्णय घ्या अन्यथा आंदोलन मिश्र करण्याचा इशारा सातारा देवळाई भागातील संयोजन समितीचे रवींद्र पिंगळीकर, सविता कुलकर्णी, प्रा.स्मिता अवचार,प्रा एकनाथ साळुंके , लक्ष्मन शिंदे,असद पटेल, ॲड सुधीर कुलकर्णी,राजेंद्र कुमावत, राजेंद्र फिरोदिया,प्रा भारती भांडेकर, कल्पना राजपूत,मारोती वीर,आर.डि भुकेले, आबासाहेब देशमुख, महेश चिद्रवार, पद्मसिंह राजपुत, शरद देशपांडे, अनंत सोन्नेकर, नामदेव पवार,दिलीप भोपे, अश्विनी बेंद्रे,अनिरुद्ध जागीरदार , सुनिल गुट्टे, मीनल ईप्पर,बाजीराव गाडे, अँड . क्षितिज रोडे, अंबादास रगडे, अशोक तिनगोटे, ज्ञानेश्वर बोरसे यांनी दिला.