'जायकवाडी धरणावर सौरऊर्जा प्रकल्प नको'; भल्या पहाटे हजारो मच्छिमार उतरले नाथसागरात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:06 PM2024-02-07T12:06:37+5:302024-02-07T12:10:13+5:30
जायकवाडी धरणात उतरून हजारो मच्छीमारांनी भल्या पहाटे सुरू केले जलसमाधी आंदोलन
- दादासाहेब गलांडे
पैठण: जायकवाडी धरणावरील प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांनी आज पहाटे अचानक नाथसागरात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आंदोलक मच्छीमारांची संख्या वाढत जात असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
केंद्र सरकारच्या अधिन असलेल्या नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेडला मराठवाड्यातील जायकवाडी धरण जलाशयात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, या प्रकल्पामुळे हजारो मच्छीमारांचा व्यवसाय संपुष्टात येऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सदरील हा प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यात यावा यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील हजारो मच्छीमार बांधवांनी आवाज उठवला आहे. अनेक वेळ आंदोलन करून प्रशासनास निवेदन देऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही.
दरम्यान, आज जायकवाडी मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या वतीने दोन्ही जिल्ह्यातील मच्छीमार दुपारी बारा वाजता नाथसागरावर आंदोलन करणार होते. मात्र, आंदोलनाची वेळ दुपारी बाराची असताना गमिनी काव्याने भल्या पहाटेच हजारो मच्छीमारांनी नाथसागरात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाआहे . तहसीलदार सारंग चव्हाण, डीवायएसपी सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि जगदाळे सह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी येथे उपस्थित आहेत.
जायकवाडी धरणावरील तरंगता सौरऊर्जा प्रकल्प रद्द करा; हजारो मच्छीमारांनी भल्या पहाटे नाथसागरात सुरू केले जलसमाधी आंदोलन #chhatrapatisambhajinagarpic.twitter.com/dbBnxddyq2
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) February 7, 2024
२ लाख मच्छीमारांचा प्रश्न
छत्रपती संभाजी नगर अहमदनगर जिल्हा मिळून केलेल्या सर्वेनुसार बावीस हजार कुटुंब मच्छीमार व्यवसाय करत आहेत.मच्छीमारी करणाऱ्यांची संख्या दोन लाखाच्या घरात आहे. दिवसाला एक मच्छीमार तीनशे ते चारशे रुपयांचा व्यवसाय करत असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यामुळेच प्रस्थापित सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी आंदोलक करत आहेत.