वाळूज, वडगावातील अनधिकृत भूखंड नोंदणी रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:24 PM2018-12-29T23:24:43+5:302018-12-29T23:24:56+5:30
सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया वाळूज, वडगाव हद्दीतील अनधिकृत भूखंडाच्या नोंदी रद्द करून दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी नागरिकांच्या वतीने विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले.
वाळूज महानगर : सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया वाळूज, वडगाव हद्दीतील अनधिकृत भूखंडाच्या नोंदी रद्द करून दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी नागरिकांच्या वतीने विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले.
वाळूज (बु.) गट क्रमांक ३ मध्ये शिवजी पटेल व इतरांच्या मालकीच्या जमिनीवर सिडको प्रशासनाची परवानगी न घेता हनुमाननगर नावाने प्लॉटिंग पाडण्यात आली आहे. या जमिनीचे तुकडे करून भूखंडाची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे वाळूज ग्रामपंचायतीने १६ मे रोजी आयोजित मासिक सभेत नियमबाह्यपणे हनुमाननगरातील प्लॉटिंगची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी घेण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संदीप पठारे व रविकिरण आढाव यांनी पाच महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत, तहसीलदार, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेकडे तक्रारी करून प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र, याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेची फसवणूक होत आहे. दोषी ग्रामपंचायत पदाधिकाºयांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून बेकायदेशीररीत्या मंजूर केलेले रेखांकन रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भात शनिवारी खालेद पठाण, संदीप पठारे, रविकिरण आढाव, राहुल भालेराव आदींच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
वडगावातील ५७५ नोंदींचा समावेश
वडगाव ग्रामपंचायतीने बेकायदेशीररीत्या सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया विविध गट नंबरमधील जवळपास ५७५ नोंदी ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ८ ला घेतल्या आहेत. विस्तार अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत ग्रामपंचायतीने नियमबाह्य नोंदी घेतल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात जि. प. प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे.