फेसबुक पोस्टवरून दाखल गुन्हा खंडपीठात रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:48 PM2018-12-25T23:48:46+5:302018-12-25T23:49:23+5:30
मित्तलकुमार तवले यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवरून दाखल गुन्हा औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी रद्द केला
औरंगाबाद : मित्तलकुमार तवले यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवरून दाखल गुन्हा औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी रद्द केला .
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा पोलीस ठाण्यात भादंवि कलम १५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण शासनाकडून होत नसेल तर किमान त्यांच्या अधिकारांवर गदा तरी आणू नका, असे खंडपीठाने म्हटले आहे.
मित्तलकुमार तवले यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टवरून वादंग निर्माण झाले होते. संवाद व्हावा अथवा खुली चर्चा व्हावी यासाठी सदरील पोस्ट शेअर करण्यात आली होती. फेसबुकवर टाकलेली पोस्ट ही प्रश्नार्थक होती; परंतु चुकीचा अर्थ लावून काही तरुणांनी मित्तलकुमार यांच्या विरुद्ध रान उठविले होते. यासंदर्भात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी मित्तलकुमार यांनी अॅड. मोहनीश थोरात यांच्यामार्फत खंडपीठात अर्ज सादर केला होता. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद क्रमांक १९ मध्ये नमूद असलेल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य आणि खराखुरा अर्थ तसेच त्याचे संवर्धन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार घेतला गेला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर खंडपीठाने मित्तलकुमार यांचा अर्ज मंजूर करीत त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.