अकार्यरत ८८३ धर्मादाय संस्थांची नोंदणी रद्द; ४ न्यायालयात ७००० संस्थांची तपासणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 03:10 PM2017-11-14T15:10:41+5:302017-11-14T15:15:09+5:30
जिल्ह्यातील अकार्यरत धर्मादाय संस्थांच्या तपासणीची विशेष मोहीम सध्या सुरू असून, अकार्यरत संस्थांची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
- डॉ. खुशालचंद बाहेती
औरंगाबाद : जिल्ह्यातील अकार्यरत धर्मादाय संस्थांच्या तपासणीची विशेष मोहीम सध्या सुरू असून, अकार्यरत संस्थांची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ८८३ अशा संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
सुमारे २ महिन्यांपूर्वी धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी धर्मादाय संस्थांची माहिती संगणकीकृत करण्याची योजना मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत राबवली. या मोहिमेत सर्व धर्मादाय संस्थांची माहिती २६ कॉलममध्ये भरण्यात आली. यावेळी असे लक्षात आले की, मराठवाड्यातील हजारो धर्मादाय संस्थांनी अनेक वर्षे त्यांचे आॅडिट केलेच नाहीत किंवा तसे धर्मादाय आयुक्त कार्यालयास कळविलेले नाही. यातील काही संस्था १९६५ पासून नोंदणीकृत आहेत. तथापि, त्यांचे अहवाल प्राप्तच नाहीत. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात अशा संस्थांची संख्या ६,९०० पेक्षा जास्त आहे, अशा सर्व संस्थांना याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
या नोटिसीची ३० दिवसांची मुदत संपल्यानंतर यावर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत दररोज सुनावणी चालू असून, असमाधानकारक खुलासे देणा-या किंवा खुलासे ना देणा-या अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील ८८३ अशा संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. दररोज सुनावणी घेणे व पडताळणी करून अंतिम निर्णय घेण्यासाठी २ महिन्यांचा दररोजचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यातील ७,००० संस्थांबद्दल निर्णय होईल.
मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अशा संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांची मुदत संपताच विशेष मोहीम सुरू होईल व अकार्यरत किंवा आॅडिट न केलेल्या संस्थांची नोंदणी रद्द होईल. यामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कामकाजातही सुधारणा होणार असून, उर्वरित संस्थांवर प्रभावी देखरेख करता येणार आहे.
चार न्यायालयांत दैनंदिन सुनावणी
सार्वजनिक धर्मादाय संस्थांची तपासणी मराठवाडाभर सुरू असून, औरंगाबाद जिल्ह्यात यासाठी ४ न्यायालये दैनंदिन सुनावणी घेत आहेत. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील ८८३ अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
- श्रीकांत भोसले, सहआयुक्त धर्मादाय नोंदणी कार्यालय, औरंगाबाद विभाग.
रद्द झालेल्या संस्थांचा तारीखनिहाय तपशील
६/११/१७ - १६०,
७/११/१७ - १९१,
८/११/१७ - १८९,
९/११/१७ - १५६,
१०/११/१७ - १८७