'पेट - २' साठी परीक्षा केंद्र रद्द; आता ऑनलाईन कोठूनही द्या परीक्षा

By सुमेध उघडे | Published: March 5, 2021 02:09 PM2021-03-05T14:09:07+5:302021-03-05T14:11:51+5:30

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university Cancelled exam center for PET -2 ‘पेट-१’ परीक्षेच्या पारदर्शकतेबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर 'पेट - २' परीक्षा केंद्रावर घेण्याच्या निर्णयामुळे २१ फेब्रुवारीस होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

Cancellation of examination center for Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university's PET -2; Now take the exam from anywhere online | 'पेट - २' साठी परीक्षा केंद्र रद्द; आता ऑनलाईन कोठूनही द्या परीक्षा

'पेट - २' साठी परीक्षा केंद्र रद्द; आता ऑनलाईन कोठूनही द्या परीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्दे३० जानेवारी, २०२१ रोजी ‘पेट-१’ ऑनलाइन पद्धतीने घेतली.६ हजार ७७५ विद्यार्थी पेट -२ साठी पात्र झाले आहेतअधिसभा सदस्यांनी परीक्षा केंद्र रद्द करण्याची भूमिका मांडली

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पेटचा दुसरा पेपर पहिल्या पेपरसारखाच ऑनलाइन कोठूनही देता येईल, असे अधिसभेच्या आजच्या बैठकीत कुलगुरू प्रमोद येवले यांनी जाहीर केले. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांनी घरून दिलेल्या ‘पेट-१’ परीक्षेच्या पारदर्शकतेबद्दल अनेक तक्रारीही प्राप्त झाल्याने कुलगुरूंनी 'पेट - २' ही परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असा निर्णय घेतला होता. 'पेट - २' परीक्षा केंद्रावर घेण्याच्या निर्णयामुळे २१ फेब्रुवारीस होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आजच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमधील 'पेट -२ 'च्या परीक्षेबद्दलची संदिग्धता संपली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्रयस्थ संस्थेमार्फत ३० जानेवारी, २०२१ रोजी ‘पेट-१’ ऑनलाइन पद्धतीने घेतली. ही परीक्षा विद्यार्थ्यांनी घरून दिली होती. यात अनेक गैर प्रकार झाल्याची चर्चा होती. त्यानंतर विद्यापीठाकडे या परीक्षेच्या पारदर्शकतेबद्दल अनेक तक्रारीही प्राप्त झाल्या. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुद्धा फटका बसल्याचे पुढे आल्याने पेट - २ परीक्षा केंद्रावर घेण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी, ‘पेट-२’ ही ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांनी घरून न देता ती केंद्रावर येऊनच द्यावी, असा निर्णय जाहीर केला. यानंतर प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली पाचसदस्यीय समिती स्थापन करून परीक्षा केंद्र आणि इतर तांत्रिक बाबी अभ्यासण्यात आल्या. यामुळे पेट- २ ची परीक्षा नियोजित वेळेत झाली नाही.

दरम्यान, आज झालेल्या अधिसभेच्या बैठकीत सदस्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 'पेट- २' परीक्षा केंद्रावर घेण्याचा निर्णय रद्द करावा. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण व्होऊ शकतो अशी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे मोठा गदारोळ झाला, शेवटी चर्चेनंतर कुलगुरू प्रमोद येवले यांनी पेटचा दुसरा पेपर पहिल्या पेपरसारखाच ऑनलाइन कोठूनही देता येईल असे जाहीर केले. 'पेट - २ ' कधी होणार याचा निर्णय येत्या आठवड्यात घेणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मराठवाड्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पेट -२ साठी पात्र विद्यार्थ्यांना कोठूनही ऑनलाईन परीक्षे देता येणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

६ हजार ७७५ विद्यार्थी पात्र
‘पेट-१’चा निकाल १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ६ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करून ते ‘पेट-२’ला पात्र झाले. आता ही परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नोत्तराची कोठूनही देता येणार आहे. 

Web Title: Cancellation of examination center for Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university's PET -2; Now take the exam from anywhere online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.