नाथषष्ठी रद्द झाल्याने ७० कोटींच्या उलाढालीला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 07:42 PM2020-03-12T19:42:02+5:302020-03-12T19:44:05+5:30

आर्थिक गणित कोलमडले, व्यापारी माघारी

With the cancellation of Nathshashi, a break of 70 crores business in Paithan | नाथषष्ठी रद्द झाल्याने ७० कोटींच्या उलाढालीला लागला ब्रेक

नाथषष्ठी रद्द झाल्याने ७० कोटींच्या उलाढालीला लागला ब्रेक

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापाऱ्यांना बसला मोठा फटका  पैठण शहरातील नाथषष्ठी यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते.

- संजय जाधव 

पैठण : जवळपास ७० कोटींची उलाढाल होणारी नाथषष्ठी यात्रा प्रशासनाने ऐन वेळेवर रद्द केल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पैठण शहरातील व बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या या निर्णयामुळे जबर हादरा बसला असून, जवळपास ७० कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे. बुधवारी पैठण शहरातून परत जाताना अनेक व्यापाऱ्यांचे डोळे पाणवले होते. 

पैठण शहरातील नाथषष्ठी यात्रा गुढीपाडव्यापर्यंत चालते. यात्रेत बैलगाडीपासून गळ्यातील तुळशीमाळेपर्यंत सर्वकाही मिळते. ज्या वस्तू शहरी बाजारपेठेत मिळत नाहीत, अशी घोंगडी, बेलने, पोळपाट, मृदंग, पेटी, तबला, चाटू, काठवत, भांडे, निरंजन, समयी, टाळ, अशा अनेक वस्तूंची दुकाने यात्रेत १५ दिवस व्यवसाय करतात. 

नाथषष्ठी यात्रेत व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रभरातून व्यापारी येतातच. शिवाय गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांतील व्यापारीही हजेरी लावतात. नाथषष्ठीसाठी पैठण शहरातील व्यापारी महिनाभरापासून तयारी करतात. शहरातील वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता किराणा माल व कापड मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी भरून ठेवला आहे. वर्षभरात जेवढा किराणा माल विकला जातो. तेवढाच माल षष्ठी कालावधीत विकला जातो. यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने नाथषष्ठी यात्रेचे मोठे महत्त्व आहे. एकंदरीत स्थानिक व बाहेरचे व्यापारी मिळून नाथषष्ठी यात्रेत ७० कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, नाथषष्ठीच रद्द झाल्यामुळे ७० ते ८० कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला आहे.

दीड कोटीचा रवा, मैदा खराब होणार
नाथषष्ठीदरम्यान पैठण शहरात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांकडून रवा, मैदा व बेसन यासह साखर, मुरमुरे मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. नाथषष्ठीमुळे पैठण शहरातील व्यापाऱ्यांनी रवा, मैदा, बेसन, साखर आदी जवळपास दीड कोटी रुपयांचा माल दुकानात भरला आहे. यात्रा रद्द झाल्याने आता हा माल विकला जाणार नाही. दुकानातही हा माल जास्त दिवस टिकत नाही. यामुळे शहरातील किराणा व्यापाऱ्यांना रवा, मैदा विक्री न झाल्यामुळे दीड कोटीचा फटका बसणार असल्याचे किराणा व्यापारी मधुसूदन मुंदडा यांनी सांगितले.

२० लाख रुपयांचा माल उधारीवर दिला, रक्कम गुंतली
नाथषष्ठीदरम्यान धोतर, लुगडे, सेमी पैठणी व उपरणे आदींची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यामुळे दुकानातील स्टॉक वाढवला. दरम्यान, इतर व्यापाऱ्यांना षष्ठीदरम्यान विक्रीसाठी होलसेल दराने २० लाख रुपयांचा माल दिला आहे. यात्रा रद्द झाल्याने मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतून पडला आहे. पुढील काही वर्षे याचा परिणाम व्यवसायावर होण्याची भीती शहरातील कापड व्यापारी पवन लोहिया यांनी व्यक्त केली असून, इतर सर्व व्यापाऱ्यांची अशीच परिस्थिती असल्याचे सांगितले.

देणगीतही घट होणार 
यात्रा रद्द करायची होती, तर अगोदर कल्पना द्यायला पाहिजे होती. यात्रेची आढावा बैठक घेऊन दुसऱ्या दिवशी प्रशासनाने यात्रा रद्द केल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे व्यापारी नंदलाल लाहोटी यांनी सांगितले. यात्रा रद्द झाल्याने नाथ संस्थानच्या देणगी पेटीलाही फटका बसणार आहे.

Web Title: With the cancellation of Nathshashi, a break of 70 crores business in Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.