सभेला एक लाख लोक आले तरच उमेदवारीचा विचार; उदय सामंतांचा खळबळजनक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 07:02 PM2024-08-13T19:02:24+5:302024-08-13T19:03:01+5:30

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकवाक्यता ठेवावी, परस्परविरोधी चर्चा बंद करावी, उदय सामंत यांचे आवाहन

Candidacy is considered only if one lakh people attend the meeting; Uday Samanta's alarming warning to MLAs | सभेला एक लाख लोक आले तरच उमेदवारीचा विचार; उदय सामंतांचा खळबळजनक इशारा

सभेला एक लाख लोक आले तरच उमेदवारीचा विचार; उदय सामंतांचा खळबळजनक इशारा

छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्या २० ऑगस्टपासून मराठवाड्यात सभा होतील. या सभांना एक लाख लोक आले तरच, आमदारांच्या उमेदवारीचा विचार होईल, अन्यथा तिकीट कापले जाईल, असा इशाराच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे महायुतीच्या आमदारांना दिला. सामंतांच्या इशाऱ्याने आमदारांमध्ये खळबळ उडाली.

संत एकनाथ रंगमंदिरात सोमवारी महायुतीच्या मराठवाडा पदाधिकारी समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला उद्योग मंत्री सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. संजय शिरसाट, आ. अनिकेत तटकरे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ. रमेश कराड, आ. तानाजी मुटकुळे, आ. ज्ञानराज चौघुले, माजी मंत्री अर्जुन खोतकर, कैलास पाटील, शिंदेसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, भरत राजपूत, भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय खंबायते, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख अभिजित देशमुख आणि समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन जाेशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. आ. तटकरे यांनी प्रास्ताविक केले.

सामंत म्हणाले की, शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपसातील हेवेदावे दूर ठेवून एकसंधपणे निवडणूक जिंकायची आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकवाक्यता ठेवावी, परस्परविरोधी चर्चा बंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. जे लोकसभेत झाले ते विधानसभेत होऊ द्यायचे नाही.

खा. भुमरे म्हणाले की, महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काम केल्याने छत्रपती संभाजीनगरचा गड जिंकला. जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व ९ जागा महायुतीने जिंकायच्या आहेत. खा. डॉ. कराड, आ. शिरसाट यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सरकारने सर्व घटकांसाठी योजना आणल्याचे नमूद केले.

सावत्र भावांना लोळवायचे
लाडक्या बहिणींबद्दल वाईट विचार करणाऱ्या सावत्र भावांना आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला लोळवायचे असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितले. लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होईल, असा अपप्रचार विरोधक करीत आहेत. मात्र, राज्य सरकारने या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपये मंजूर केल्याचे सावे म्हणाले.

२० सप्टेंबर रोजी आचारसंहिता
३८ दिवसांनी अर्थात २० सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता सावे यांनी व्यक्त केली. १५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होईल. यामुळे पुढील दिवसांत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Candidacy is considered only if one lakh people attend the meeting; Uday Samanta's alarming warning to MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.