उमेदवार निवांत; कार्यकर्ते-मतदारांमध्ये धाकधूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:36 PM2019-05-22T23:36:45+5:302019-05-22T23:37:25+5:30
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांसह तीन विद्यमान आमदार रिंगणात आहेत. प्रमुख चारही उमेदवार आपल्या निवडीबद्दल प्रचंड उत्साही आहेत. त्यामुळे नेमके निवडून येणार कोण? असा प्रश्न नागरिकांना, कार्यकर्त्यांना पडला आहे. आज मतमोजणीनंतर औरंगाबादचा खासदार कोण हे जाहीर होईल. सध्या सर्वच उमेदवार निवांत आहेत. निकालाबाबत कार्यकर्ते-नागरिकांमध्ये बरीच धाकधूक दिसून येत आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांसह तीन विद्यमान आमदार रिंगणात आहेत. प्रमुख चारही उमेदवार आपल्या निवडीबद्दल प्रचंड उत्साही आहेत. त्यामुळे नेमके निवडून येणार कोण? असा प्रश्न नागरिकांना, कार्यकर्त्यांना पडला आहे. आज मतमोजणीनंतर औरंगाबादचा खासदार कोण हे जाहीर होईल. सध्या सर्वच उमेदवार निवांत आहेत. निकालाबाबत कार्यकर्ते-नागरिकांमध्ये बरीच धाकधूक दिसून येत आहे.
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत मागील २० वर्षांमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस असाच सामना पाहायला मिळला. प्रत्येक वेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना बाजी मारत होती. यंदा हिंदुत्वाचे कार्ड अजिबात चालले नाही. जातीय समीकरणे कधी नव्हे तेवढी प्रभावी ठरली. शहरी आणि ग्रामीण भागात प्रमुख चारही उमेदवारांनी मतदारांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यामुळे नेमके निवडून येणार कोण? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.
शिवसेना विजयावर ठाम
यंदा लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेची चारही बाजूने कोंडी झाली तरी चंद्रकांत खैरे निवडून येतील, असा ठाम विश्वास सेना नेते व्यक्त करीत आहेत. मतदारांनी पुन्हा एकदा कौल सेनेच्या पारड्यात टाकल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. औरंगाबाद पश्चिम, कन्नड, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ सेनेसाठी जमेची बाजू असल्याचेही सांगण्यात येत आहे.
बहुजन वंचित आघाडीचा फार्म्युला
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात एमआयएमने या निवडणुकीत अचानक उडी मारून सर्व राजकीय समीकरणे बदलून टाकण्याचा प्रभावी प्रयत्न केला. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून आ.इम्तियाज जलील निवडणूक मैदानात उतरले. दलित, मुस्लिम समाजाने त्यांना तन, मन, धनाने साथ दिली. मुस्लिम मतदारांचा काही प्रमाणात कल पारंपरिक काँग्रेस पक्षाकडे दिसून आला. ही बाब एमआयएमसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शंभर टक्के दलित समाजाने आपले योगदान दिले.
ट्रॅक्टरचा निवडणूक फॅक्टर
कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी विद्यमान खासदाराच्या विरोधात मोर्चा उघडला होता. निवडणूक रिंगणात जाधव यांनी उडी घेऊन राजकीय विश्लेषकांनाही चक्रावून सोडले. ट्रॅक्टर हे निवडणूक चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या जाधव यांनी जोरदार मुसंडी मारली. शहरी भागात तर अर्ध्याहून अधिक भाजप कार्यकर्ते जाधव यांच्या प्रचारात मग्न होते. त्यामुळे सेनेची अवस्था खैबरखिंडीत अडकल्यासारखी झाली होती. शहरी आणि ग्रामीण भागात जाधव यांनी बऱ्यापैकी जोर लावला. ईव्हीएमपर्यंत किती मतदान नेण्यात आले हे आज स्पष्ट होईल.
काँग्रेसने घेतली बरीच मेहनत
काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनीही यंदा लोकसभा निवडणुकीत बरीच मेहनत घेतली. शहरी भागापेक्षा त्यांनी ग्रामीण भागावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले होते. एमआयएम पक्षापासून दुखावलेला एक मोठा वर्ग काँग्रेसकडे वळाल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात येत आहे. शहरी भागात काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यमान भाजप सरकारविरुद्ध नाराजीचा फायदा ग्रामीणमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे.
------------