दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी निश्चित; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्धवसेनेत धुसफूस

By बापू सोळुंके | Published: October 21, 2024 07:24 PM2024-10-21T19:24:39+5:302024-10-21T19:25:21+5:30

इच्छुकांनी बंडखोरीची भाषा सुरू केल्याने त्यांना शांत करणे उद्धवसेनेसमोर आव्हान

Candidates coming from other parties are certain; Disruption in Uddhav Sena in Chhatrapati Sambhajinagar district | दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी निश्चित; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्धवसेनेत धुसफूस

दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी निश्चित; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्धवसेनेत धुसफूस

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांची नावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दोन दिवसांपूर्वी जवळपास निश्चित केली. यातील चार उमेदवार दुसऱ्या पक्षातून आयात केलेले आहेत. यामुळे उद्धवसेनेत धुसफूस सुरू झाली. विशेषत: औरंगाबाद मध्य आणि पश्चिममधील इच्छुकांनी बंडखोरीची भाषा सुरू केल्याने त्यांना शांत करणे उद्धवसेनेसमोर आव्हान असेल. जिल्ह्यातील नऊपैकी सहा मतदारसंघांतून उद्धवसेना उमेदवार देण्याची शक्यता आहे. औरंगाबाद पश्चिममधून राजू शिंदे, मध्यमधून किशनचंद तनवाणी, कन्नडमधून विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत, वैजापूरमधून दिनेश परदेशी, तर सिल्लोडमधून सुरेश बनकर या पाच नावांवर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. पैठणची उमेदवारी अद्याप अंतिम केलेली नाही.

जुलै २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हा जिल्ह्यातील पाच आमदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला होता, तेव्हापासून पक्षाला साथ देणाऱ्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची विधानसभेसाठी लॉटरी लागेल असे बोलले जात होते. दुसऱ्या फळीतील पक्ष पदाधिकाऱ्यांनी कामाला जोरदार सुरुवात केली होती. त्यांचे मतदारसंघात भावी आमदार म्हणून होर्डिंग्ज लागले होते. पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल, असा शब्द त्यांना स्थानिक नेत्यांकडूनही वेळोवेळी दिला जात होता. ऐनवेळी मात्र आयात नेत्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने उद्धवसेनेत धुसफूस सुरू झाली आहे. मध्यमधून माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि शहरप्रमुख बाळासाहेब थोरात इच्छुक होते. पक्षाने तनवाणी यांची उमेदवारी निश्चित केल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी शनिवारी रात्री चिकलठाणा विमानतळावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते आ. अंबादास दानवे यांना गाठून राजीनामा देण्याचा इशारा दिला. पश्चिममधील इच्छुक बाळासाहेब गायकवाड हे देखील अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मनसेकडूनही त्यांना ऑफर असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Candidates coming from other parties are certain; Disruption in Uddhav Sena in Chhatrapati Sambhajinagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.