ऑनलाईन खर्च सादरीकरणासाठी उमेदवारांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:02 AM2021-01-24T04:02:06+5:302021-01-24T04:02:06+5:30

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीत प्रचारादरम्यान झालेला खर्च ऑनलाईन ...

Candidates for online cost presentation | ऑनलाईन खर्च सादरीकरणासाठी उमेदवारांची दमछाक

ऑनलाईन खर्च सादरीकरणासाठी उमेदवारांची दमछाक

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीत प्रचारादरम्यान झालेला खर्च ऑनलाईन पद्धतीने सादरीकरणासाठी विविध अडचणी येत असल्याने विजयी व पराभूत उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रांजणगाव, जोगेश्वरी, पंढरपूर, वाळूज, पाटोदा, आंबेलोहळ, तीसगाव, कासोडा आदी ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीसाठी सदस्य संख्येच्या वर्गवारीनुसार उमेदवारांना प्रचारासाठी खर्च करण्याची परवानगी निवडणूक आयोगाच्यावतीने देण्यात आली होती. या निवडणुकीत प्रचारादरम्यान होणाऱ्या खर्चाचा तपशील ठेवण्यासाठी उमेदवारांना बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. ट्रु-व्होटर अ‍ॅपद्वारेही प्रचारादरम्यान झालेला खर्च सादरीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निकालानंतर ३० दिवसांच्या आत खर्चाचा तपशील देणे बंधनकारक असून, या मुदतीत खर्चाचा तपशील न देणाऱ्या विजयी व पराभूत उमेदवारांवर कारवाई करण्याचा इशाराही निवडणूक आयोगाच्यावतीने देण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी बँकेत स्वतंत्र खाते उघडलेले असून, आयोगाच्या निर्देशानुसार या बँक खात्यात प्रचारासाठी होणाऱ्या खर्चाची तजवीज करून ठेवली होती. मात्र प्रचारादरम्यान बहुतांश उमेदवारांनी बँक खात्यातील रक्कम न काढता खिशातून प्रचाराचा खर्च भागविला आहे.

२१ उमेदवारांची दमछाक

वाळूज महानगर परिसरातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, ३०० च्या आसपास उमेदवार विजयी झाले असून, जवळपास १ हजार उमेदवार पराभूत झाले आहेत. आता निकाल लागल्यानंतर प्रचारादरम्यान झालेल्या खर्च ऑनलाईन पद्धतीने सादर करताना विजयी व पराभूत उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. बहुतांश उमेदवारांचे जेमतेम शिक्षण झालेले असल्याने त्यांना ट्रु-व्होटर अ‍ॅपद्वारे खर्चाचा तपशील देताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेट कॅपे व सेतू सुविधा केंद्रावरही सतत कामकाज ठप्प होत असल्याने उमेदवारांना तालुक्याच्या ठिकाणी पायपीट करावी लागत आहे.

प्रतिक्रिया...

उमेदवारांचा ऑफलाईन अर्जावर भर

ऑनलाईन पद्धतीने खर्च सादर करताना अडचणी येत असल्यामुळे उमेदवार खर्चाची बिले घेऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. ऑनलाईन पद्धतीने खर्च सादर करताना पुरेशे ज्ञान नसल्याने तसेच इंटरनेट मिळत नसल्याने वाळूज महानगर परिसरातील बहुतांश उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने तहसील कार्यालयात खर्च सादरीकरणासाठी जात असल्याचे रांजणगावच्या सदस्या नंदाताई बडे यांनी सांगितले.

खर्चाचा तपशील जुळविताना अडचणी

ऑफलाईन पद्धतीने खर्चाचा तपशील सादर करताना १०० रुपयांचे शपथपत्र, प्रचारादरम्यान झालेल्या खर्चाची बिले, पावत्या एकत्रित करताना उमेदवारांची भंबेरी उडत आहे. प्रचाराचे साहित्य, हॉटेलची बिले, बॅनर, पत्रके आदींची बिले काढण्यासाठी उमेदवारांना चांगलाच घाम गाळावा लागत असल्याचे वाळूज ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य सचिन काकडे यांनी सांगितले.

-----------------------

Web Title: Candidates for online cost presentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.