'आयटीआय' नोकरभरतीत बनावट कागदपत्रे आढळल्यास उमेदवार बाद होणार
By राम शिनगारे | Updated: August 21, 2023 13:31 IST2023-08-21T13:31:35+5:302023-08-21T13:31:54+5:30
राज्यातील विविध आयटीआय संस्था, कार्यालयातील आठ संवर्गातील ७७२ जागांच्या भरतीसाठी १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात आठ पदांचा समावेश आहे.

'आयटीआय' नोकरभरतीत बनावट कागदपत्रे आढळल्यास उमेदवार बाद होणार
छत्रपती संभाजीनगर : आयटीआय संस्थांमधील सुरु असलेल्या नोकरभरतीमध्ये एकाच उमेदवाराने वेगवेगळ्या आठ पदांसाठी स्वतंत्र अनुभव प्रमाणपत्र सादर करून प्राथमिक गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. हा घोटाळा ' लोकमत ' ने उघडकीस आणल्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रक काढून उमेदवारांचे अनुभव प्रमाणपत्र पडताळणीमध्ये बनावट असल्याचे आढळून आल्यास संबंधित उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे पात्रताधारक शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील विविध आयटीआय संस्था, कार्यालयातील आठ संवर्गातील ७७२ जागांच्या भरतीसाठी १६ फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात आठ पदांचा समावेश आहे. शेकडो उमेदवारांनी आठही पदांसाठीची एकाच कंपनीकडून वेगवेगळी बनावट अनुभव प्रमाणपत्रे हस्तगत करीत अर्ज केल्याचे परीक्षेनंतर जाहीर झालेल्या प्राथमिक गुणवत्ता यादीतून उघडकीस आले होते. याविषयी 'काय सांगता? ७७२ पदांच्या भरतीत घोटाळा! ' या मथळ्याखाली ' लोकमत ' ने शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले. त्याची तत्काळ दखल घेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने त्याच दिवशी सायंकाळी परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकानुसार सर्व उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीच्या आधीन राहून १६ एप्रिल रोजी घेतलेल्या परीक्षेकरिता परवानगी देण्यात आली होती. तसेच प्राथमिक गुणवत्ता यादी ही तात्पुरती आहे. यानंतर उमेदवारांची निवड सूची प्रसिद्ध करून निवड सूचीतील उमेदवारांच्या प्रमाणपत्र, कागदपत्रांची पडताळणीची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यात अनुभव प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रे बनावट आढळल्यास संबंधित उमेदवार पुढील भरती प्रक्रियेकरिता अपात्र ठरविण्यात येणार आहे. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही, असे संचालक दिगंबर दळवी यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
काय सांगता? 'आयटीआय'मधील ७७२ पदांच्या नोकरभरतीत घोटाळा
...तर हा उमेदवारांवर अन्याय ठरेल
एकाच उमेदवाराने आठ पदांसाठी अर्ज केलेला असेल तर त्याच्या कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय त्यास यादीतून वळगणे अन्यायकारक ठरले. त्यामुळे उमेदवारांच्या अनुभव प्रमाणपत्रांची पडताळणी करताना बनावट आढळल्यास संबंधितास भरती प्रक्रियेतूनच बाद ठरविण्याची कार्यवाही केली जाईल. एकापेक्षा अधिक पदांसाठी उमेदवार पात्र ठरल्यास ज्या पदावर रुजू होण्यास तो इच्छुक असेल त्या पदाचेच नियुक्ती आदेश जारी करण्यात येतील, असेही संचालक दळवी यांनी कळविले आहे.