‘औरंगाबाद’साठी निघाला कँडल मार्च; खासदार इम्तियाज जलील यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 02:52 PM2023-03-10T14:52:28+5:302023-03-10T14:53:45+5:30
‘औरंगाबाद था, है, रहेगा, आय लव्ह औरंगाबाद’ अशा घोषवाक्याचे फलक मार्चमध्ये धरण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर : नामांतरविरोधी कृती समितीतर्फे गुरुवारी रात्री निघालेल्या कँडल मार्चला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषत: या मार्चमध्ये मुस्लीम महिलांची लक्षणीय उपस्थिती राहिली. खा. इम्तियाज जलील यांनी या मार्चचे नेतृत्व केले. दरम्यान, जमावबंदी असताना विनापरवानगी मोर्चा काढल्याने खा. इम्तियाज जलील यांच्यासह शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपासून या समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयापासूनच कँडल मार्चला प्रारंभ झाला. तो भडकल गेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला व तेथे मार्चाची सांगता झाली व बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या मार्चमध्ये सहभागी झालेले पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले व तेथे सभा झाली.
‘औरंगाबाद था, है, रहेगा, आय लव्ह औरंगाबाद’ अशा घोषवाक्याचे फलक मार्चमध्ये धरण्यात आले होते. कँडल व मोबाइलच्या बॅटऱ्यांच्या प्रकाशात निघालेल्या या मार्चमध्ये कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. नामांतराच्या प्रश्नावर मतदान घ्यावे. त्यातून जो निकाल येईल, तो आम्हाला मान्य राहील, अशी भूमिका यावेळी जलील यांनी स्पष्ट केली.
खा. इम्तियाज जलील यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा
दरम्यान, गुरुवारी औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक मोहम्मद अय्युब जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा भडकल गेटपर्यंत कँडल मार्च करीता पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र या कँडल मार्चची परवानगी सिटीचौक पोलिसांनी नाकारली होती. तसेच असा मार्च काढू नयेत अशी नोटीस देखील पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र तरीही जलील यांच्यासह हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन कँडल मार्च काढला. त्यामुळे या प्रकरणी जलील यांच्यासह शेकडो आंदोलकांवर जमावबंदी आदेशाचं उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोज शेकडो आक्षेप दाखल
२७ मार्चपर्यंत नामांतर विरोधी आक्षेप, हरकती नोंदविण्याची मुदत आहे. रोज शेकडो आक्षेप विभागीय आयुक्तालयात दाखल करण्यात येत आहेत.